शेत जमिनीचा जीवंत सातबारा

Alive 7 -12 Utara
Agricultural Land Documents

फायदेशीर शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञा, बाजारभावाचा अंदाज आणि शेतमालाचे भाव यांचा अभ्यास तर आचश्यक आहे, त्या सोबत आवश्यक आहे, शेतजमिनीची कागदपत्रे. शेती सबंधी आणि शेत जमिनीसबंधी अनेक कागदपत्र सांभाळणे आवश्यक असते. मात्र ही कागदपत्र केवळ सांभाळून ठेवणे योग्य असून दरवर्षी आणि गरजेनुसार अशी कागदपत्र नोंदी करून अपडेट करणे आवश्यक असते. शेतजमिनी सबंधी अतिशय महत्त्वाच्या नोंदी ठेवणारा कागद म्हणजे सातबारा. प्रस्तुत लेखात सातबारा कागदाचे किती महत्त्व आहे, ते स्पष्ट केले आहे. 

{tocify} $title={Table of Contents}

शेत जमिनीचा अतिशय महत्त्वाचा कागद सातबारा 

वर्षानुवर्षे शेतीत राबणार्‍या शेतकर्‍यांना शेतजमीन ही त्यांच्या आईसारखी असते हे तर आपल्या सर्वांना माहित आहेच आणि हे आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने शबरी गावातील भूसंपादन बेकायदेशीर  ठरविले होते, त्या विरोधात ग्रेटर नोएडा डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (जीएनडीए) ने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली तेव्हा सदर खटल्याची याचिका फेटाळत  निकाल देतांना सर्वाच्च न्यायालयाने सांगितले की शेतजमीन ही शेतकर्‍यासाठी आईसारखी आहे, हे लक्षात घ्या आणि त्यानंतरच भूसंपादन करा तसेच ह्या प्रकारची याचिका दाखल केली म्हणून  जीएनडीएला दहा लाखाचाही दंड ठोठावला. पण बर्‍याच शेतकर्‍यांना अजुनही जाण नाही की जीव की प्राण असणारी ही शेतजमीन आपल्यासोबतच आणि आपल्या नावावरच व्यवस्थित राहण्यासाठी आणखी एक बाब आवश्यक असते ती म्हणजे सातबारा उतारा. शेतीच्या हक्कासंबधी अतिशय महत्त्वाचा असणार्‍या या उताराबाबत अजुनही बरेच शेतकरी गंभीर नाहीत, आजसुद्धा बहुतांशी शेतकर्‍यांना सातबारा कसा वाचावा हे कळत नाही. 

सातबारा असतो दोन भागात 

सातबारा मुख्यत: दोन भागांमध्ये विभागलेला असतो. पहिल्या भागात गावाचे नाव, जमिनीचा सर्व्हे नंबर/गट नंबर, तालुक्याचे नाव, जमिनीचे स्थानिक नाव अशा प्रकारची माहिती दिलेली असते. यासोबतच जमिनीच्या सदर गटाचे एकूूण क्षेत्र हेक्टर व आर या मापनात लिहिलेले असते. सातबाराच्या उजव्या भागाकडे इतर सविस्तर असे लिहिलेले असते. त्यात त्या जमिनीवर इतर कुणाचे हक्क म्हणजे सरकारी तगाई, सहकारी संस्था किंवा बँकेचे कर्ज असल्यास त्याची नोंद केलेली असते. जमिनीच्या क्षेत्राची नोंद करतांना लागवडीखालील क्षेत्र किती  आहे? त्यामध्ये जिरायत, बागायत जशी शेती असेल त्याप्रमाणे नोंद केलेली असते. जी जमीन लागवडीखाली नसेल अशी जमीन पोटखराब म्हणून नोंदवलेली असते. तसेच सातबार्‍यावरील मालकाचे नाव या सदरात जमिनीच्या मालकाचे नाव लिहीलेले असते. मालकाने जमीन विकल्यावर त्याच्या नावाला कंस केला जातो व त्याखाली नवीन मालकाचे नाव लिहीले जाते व असा बदल करतेवेळी जो अर्ज सादर केला असेल त्या अर्जाचा क्रमांक बाजूच्या वर्तुळात लिहीलेला असतो. तसेच ज्या कागदावरून असा बदल (फेरफार) करण्यात आला त्याचा नंबर त्या नावाच्या वरती वर्तुळात लिहीला जातो. 

गावचा नमुना नं.६

ज्यावेळी जमिनीच्या मालकासंबधी बदल होतात असे सर्व बदल ज्या फेरफाराने होतात त्यास फेरफाराचा उतारा असे म्हणतात व हाच फेरफाराचा उतार्‍याचा क्रमांक वर्तुळात लिहीलेला असतो. अशा प्रकारे जमिनीच्या मालकी हक्कामध्ये कोणत्या दिवशी व कसे बदल झालेले आहेत हे फेरफाराच्या उतार्‍यावरून समजते यास गावचा नमुना नं.६ असे म्हटले जाते. जमिनीची खरेदी विक्री, कुळाचे वारसा हक्क, गहाणखत, भाडेपट्टा, बक्षीसपत्रे, दत्तकपत्रे, कर्जमोबदला, पोटहिस्सा, एकत्रीकरण, कमीजास्तपत्रक, दिवाणी अथवा महसुली आदेश इत्यादी कारणांमुळे सातबाराच्या उतार्‍यात फेरफारीतील बदल नोंद केले जातात. 

सातबारा उतार्‍याचे सर्व ज्ञान अतिशय आवश्यक

ज्याप्रमाणे शेतकरी शेतजमिनीला महत्त्व देतात त्याचप्रमाणे त्यांनी सातबार्‍याला महत्त्व दिले पाहिजे आणि त्यावरील नोंदींचा अर्थ तपासला पाहिजे. कारण सातबारा व्यवस्थित आणि अचूक ठेवल्यामुळे खुप फायदे होतात. जमिनीच्या ठिकाणी समक्ष न जाता त्या जमिनीबाबतचा सर्व तपशील म्हणजे त्या जमिनीची भूतकाळात मालकी कोणाची होती, सध्या त्या जमिनीचे मालक कोण आहेत? शेतजमीन गावाच्या कोणत्या हद्दीमध्ये आहे, तसेच जमिनीचा गट नं., त्या जमिनीमध्ये विभागणी केली असल्यास त्याचा हिस्सा नंबर अशा सर्व बाबींची माहिती आपणाला सातबार्‍यावरून कळते. म्हणूनच प्रत्येक शेतकर्‍याला सातबारा उतार्‍याचे सर्व ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे.

नुकतीच राज्य सरकारने मोजणीसंबधी काही आकडे जाहीर केले आहेत, त्यावरून शेतकर्‍यांच्या लक्षात येईलच की सातबारा उतार्‍याच्या अचूक नोंदींची किती आवश्यकता असते. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात मोजणीची ६३ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणांपैकी ८२ टक्के प्रकरणे हद्दमोजणीची आहेत. आता सरकारने खासगी भूमापकांकडे हद्द मोजणीचे अधिकार दिल्याने मोजणी लवकर होऊन गावातील वाद मिटावेत, अशी सरकारची अपेक्षा आहे. बर्‍याच ठिकाणी शेतजमिनीवरील वाद वर्षानुवर्षे सुरू आहेत, काही वाद हे एकूण जमिनीच्या क्षेत्रफळावर असून काही वाद हे मालकी किंवा हिश्शावर आहेत. सातबारासंबधी वाद मिटावेत, सातबारा उतार्‍याचे महत्त्व शेतकर्‍यांना कळावे यासाठी अकोल्याचे तहसीलदार यांनी एक नवीनच कल्पना मांडली आहे, ती म्हणजे जीवंत सातबारा.

नवीन कल्पना जीवंत सातबारा

शेतकरी शेतजमिनीच्या नोंदींविषयी गंभीर नसल्यामुळे सात बारावरील नोंदी वर्षोनुवर्षे अद्ययावत होत नाहीत, शेतजमिनीच्या मुळ मालकाचा मृत्यु  झालातरी पुढे अनेक वर्षे मृताचेच नाव सातबारावर नमूद राहाते. पुढे वाद निर्माण झाल्यास  वारस जरी खरे असले तरी त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो, हे वाद पुढे न्यायालयात गेल्यास अनेक वर्षे शेजमिनीचे खटले सुरू राहतात. मयताच्या नावावर भलत्याच व्यक्तीने कर्ज घेणे, अनेक वर्षानंतर शेतजमिनीची नोंद तपासल्यावर त्यावर भलत्याच मालकाची नोंद असणे, सातबारावर असलेली माहिती आणि वस्तुस्थिती वेगळीच असणे अशी प्रकरणे यापुर्वी घडलेली आहेत. यासर्व समस्यांवर आता अकोल्याच्या तहसीलदारांनी एक अभिनव उपाय शोधला आहे, तो म्हणजे जिवंत सातबारा. जिवंत सातबारा म्हणजे त्यावर फक्त जिवंत व्यक्तीचीच नोंद असेल. अकोला तालुक्यातील एकूण १९९ गावांमध्ये  दिनांक १ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान जिवंत सातबारा ही मोहिम राबविली जाणार. याअंतर्गत सात-बारावरील नोंदी अद्ययावत करण्यासाठी मृत खातेदाराचे वारस पुढे न आल्यास संबधित खातेदाराचे वारस नाही असे गृहीत धरून ती जमीन शासनजमा करण्याची तजवीज असल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारस नोंदीकरिता सरपंच किंवा पोलिस पाटील यांचे दाखले असणे आवश्यक असणार आहेत. मृत मालकाच्या जागी वारस न नेमल्यास जमीन सरकारजमा होईल या भितीने किंवा सातबारा उतार्‍याचे महत्त्व कळल्यामुळे जरी सर्व सातबारा वरील नोदी जर अद्ययावत झाल्यास पुढे निर्माण होणारे वाद आपण आजच टाळू शकू. 

निष्कर्ष

शेवटी, भारतातील शेतकर्‍यांसाठी शेतीचे दस्तऐवज सांभाळणे आणि ते अद्ययावत करणे हे अतिशय महत्त्वाचे काम आहे. या कागदपत्रांमुळे शेतकर्‍यांना सरकारी योजना, क्रेडिट सुविधा आणि इतर फायदे मिळू शकतात. आपल्या देशात शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जसजसे भारत डिजिटल तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धती स्वीकारत आहे, तसतसे शेतीच्या कागदपत्रांचे महत्त्व वाढतच आहे. या कागदपत्रांमध्ये सर्वात महत्त्वाचा कागद म्हणजे सातबारा होय. जी जमीन तुम्ही शेतीसाठी उपयोगात आणत आहेत, ती तुमचीच हे स्पष्ट करणारा हा साताबारा खूप खूप महत्त्वाचा आहे. या सातबार्‍यावरील नोंदी अद्ययावत करणे किती महत्त्वाचे आहे, हे आता शेतकरी बांधवांना या लेखामुळे स्पष्ट झाले असेलच. तर, चला आजच आपला सातबारा तलाठी कार्यालयात जाऊन ताब्यात घ्या, त्यातील नोंदी तपासा आणि गरज असल्यास त्या नोंदी अपडेट करण्यासाठी अर्ज करा. 
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने