ॲस्टर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक

Aster Flower
Aster cultivation

ॲस्टर हे एक आकर्षक आणि लोकप्रिय फूल आहे, ज्याला महाराष्ट्रात सजावटीसाठी, फुलदाणी, हार-गुच्छ तयार करण्यासाठी आणि व्यावसायिक फुलशेतीसाठी मोठी मागणी आहे. त्याची रंगीबेरंगी फुले (जांभळी, गुलाबी, पांढरी, निळी) आणि लांब टिकण्याची क्षमता यामुळे ॲस्टरला बाजारात वर्षभर मागणी असते. महाराष्ट्रात ॲस्टरची लागवड, विशेषतः पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर येथे, यशस्वीपणे केली जाते.

ॲस्टर लागवड वेळ

ॲस्टरची लागवड वर्षभरात कधीही करता येते. स्थानिक हंगाम, लागवडीसाठी उपलब्ध जाती याचा विचार करून बाजारातील मागणीनुसार लागवडीची वेळ निवडावी. खरीपमध्ये जून-जुलै, रब्बीमध्ये ऑक्टोबर -नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारी मार्च महिन्यात लागवड करता येते. मात्र ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि फेब्रुवारी ते मार्च हा लागवडीचा उत्तम काळ आहे, ज्यामुळे हंगामानुसार बाजारात मागणी मिळते. बीजोत्पादनासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करावी. अन्यथा वाढणार्‍या तापमानाचा बी पोषणावर परिणाम होतो. ॲस्टर लागवड करताना सगळे क्षेत्र एकाच वेळी न लावता तीन अगर चार टप्प्यांत १५ दिवसांच्या अंतराने लावावे, म्हणजे फुले अधिक काळ बाजारात पाठविता येतील. मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि सेंद्रिय खतयुक्त जमीन या फुलपिकास आवश्यक असते. वरकस, हलक्या जमिनी, तसेच चुनखडीयुक्त जमिनीत याची लागवड करु नये. ऍस्टरला थंड ते समशीतोष्ण हवामान (१५ ते २५ अंश से.) योग्य आहे. महाराष्ट्रातील हिवाळा आणि पावसाळ्याचा शेवटचा काळ लागवडीसाठी आदर्श आहे. चांगल्या निचर्‍याची, सेंद्रिय पदार्थांनी युक्त माती (पीएच ६ ते ७) आवश्यक आहे. 

ॲस्टर बियाणे आणि रोपे

उच्च-गुणवत्तेची बियाणे किंवा रोपे निवडावीत. रोपवाटिकेत ४६ आठवड्यांत रोपे तयार होतात. रोपांमधील अंतर २० बाय ३० सेमी ठेवावे.

ॲस्टर जातींची निवड

भारतीय जाती

  • फुले गणेश व्हाईट- ही जात लांब दांडयाची फुले मिळण्यासाठी उपयुक्त असून, फुले शुभ्र पांढ-या रंगाची असतात. हंगाम चार ते पाच महिन्यांचा असतो.
  • फुले गणेश पिंक- फुलावर लवकर येणारी जात असून, निमपसरी, आकर्षक गुलाबी रंगाची फुले मिळतात. हंगाम चार त पाच महिने असतो.
  • फुले गणेश व्हायलेट- ही जात निमपसरी, फुलावर लवकर येणारी आणि गडद जांभळया रंगाची फुले मिळतात.  हंगाम चार ते पाच महिने असतो.
  • फुले गणेश पर्पल- फुले फिक्कट जांभळया रंगाची असतात.  फुलांचे चांगले उत्पादन मिळते.
  • अर्का कामिनी- गडद गुलाबी रंगाची फुले, चांगली टिकाऊ आणि आकर्षक असतात.
  • अर्का पौर्णिमा-मोठ्या आकाराची फुले, विशेषतः शोभेच्या उद्देशाने वापरली जातात.
  • अर्का शशांक- नाजूक आणि सुंदर फुले, बाजारात चांगली मागणी असलेली ही जात आहे.
  • अर्का व्हायलेट कुशन-गडद जांभळ्या रंगाची फुले, टिकाऊ आणि आकर्षक दिसतात.

परदेशी जाती

  1. ड्वार्फ क्विन- लहान आणि गडद रंगाची फुले, कुंड्यांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त असतात.
  2. पिनॅचिओ- विविध रंगछटांमध्ये उपलब्ध, शोभेच्या उद्देशाने लोकप्रिय आहेत.
  3. अमेरिकन ब्युटी- मोठ्या आणि चमकदार रंगाच्या फुलांची ही जात आहे.
  4. स्टार डस्ट-  चमकदार आणि आकर्षक फुले, विशेषतः सजावटीसाठी वापरली जातात.
  5. ५जायंट ऑफ कॅलिफोर्निया-  मोठ्या आकाराची फुले, व्यावसायिक लागवडीसाठी उपयुक्त असतात.
  6. सुपर प्रिन्सेस- नाजूक आणि सुंदर फुले, शोभेच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
  7. चायना ॲस्टर (कॅलिस्टेफस चिनेन्सिस): त्याच्या तेजस्वी रंगांसाठी आणि दीर्घ फुलदाण्यांच्या आयुष्यासाठी ओळखले जाते.
  8. बौने ऍस्टर: कॉम्पॅक्ट आणि कंटेनर बागकामासाठी योग्य.
  9. पावडरपफ ॲस्टर: नाजूक, पंख असलेल्या फुलांचे वैशिष्ट्‌य.

ॲस्टर पीक व्यवस्थापन

ॲस्टर लागवडीपुर्वी जमिनीची दोन वेळा खोल नांगरट करावी. धसकटे व हरळीच्या काशा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. हेक्टरी १२ टन शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.  लागवडीपुर्वी हेक्टरी ५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. रासायनिक खतांची मात्रा माती परीक्षणानुसार दयावी. लागवडीसाठी ६० सेमी अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. लागवड ६० बाय ३० सेमी किंवा ४५ बाय ३० सेमी किंवा ४५ बाय ४५ सेमी अंतरावर करतात.  सरी-वरंबा पध्दतीने लागवड करताना वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी. लागवडीपूर्वी रोपांची मुळे शिफारशीत बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपांची लागवड सायंकाळी करावी. लागवडीनंतर पिकाच्या गरजेनुसार पाणी दयावे.  लागवडीनंतर चार ते पाच आठवडयांनी हेक्टरी ५० किलो नत्राचा हप्ता दयावा. ॲस्टर पिकाच्या मुळया जास्त खोलवर जात नसल्यामुळे लागवड केलेले वरंबे नेहमी वाफसा अवस्थेत राहतील याची काळजी घेणे जरुरीचे आहे. 

ॲस्टर कीड आणि रोग नियंत्रण

बुरशीजन्य रोग (पावडरी मिल्ड्यू) आणि किडी (मावा) यांचा धोका असतो. सेंद्रिय किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. 

ॲस्टर कापणी आणि उत्पादन 

लागवडीनंतर ९० ते १२० दिवसांत फुले कापणीसाठी तयार होतात. फुले पूर्ण उमलल्यानंतर ती काढावीत. पूर्ण उमललेल्या फुलांची तोडणी दोन ते तीन दिवसांच्या अंतराने करावी. अशा प्रकारे काढणी केल्यास ३० दिवसात काढणी पूर्ण होते. लांब दांड्यासाठी पूर्ण वाढ झालेली आणि उमललेली फुले १० ते २० सेमी दांड्यासह कापून घ्यावीत. साधारणपणे ४ ते ६ दांड्याची मिळून एक जुडी बांधून विक्रीसाठी पाठवावी. तोडल्यानतंर फुले उन्हात ठेवू नयेत आणि फुलांवर पाणी शिंपडू नये. हेक्टरी ४० ते ४५ लाख फुले म्हणजेच १८ ते २० टन प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. बाजारभाव आणि फुलांच्या गुणवत्तेनुसार रुपये २ ते ६ लाख/एकर नफा मिळू शकतो.

बाजारपेठ

फूलांच्या सजावटीमध्ये, पुष्पगुच्छांमध्ये आणि हारांमध्ये, विशेषतः गणेश चतुर्थी आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये ऍस्टरचा वापर जास्त मागणीत आहे. ऍस्टर फुलांना मुंबई, पुणे, नाशिक येथील बाजारात मागणी आहे. लग्न समारंभ, सजावट आणि निर्यात (मध्य पूर्व देश) यासाठी वापरले जाते.

पॉलीहाऊस लागवड

महाराष्ट्रात ऍस्टरची लागवड पॉलीहाऊसमध्ये शक्य आहे. त्यामुळे हवामान नियंत्रण, कीड-रोगांपासून संरक्षण आणि वर्षभर उत्पादन शक्य होते. पॉलीहाऊसमुळे फुलांचा दर्जा सुधारतो आणि निर्यातीला मागणी मिळते.

ॲस्टर लागवडीतील आव्हाने

महाराष्ट्रातील ॲस्टर शेतकर्‍यांसमोरील काही आव्हानांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • १. हवामान बदल: अप्रत्याशित हवामानाचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होऊ शकतो.
  • २. बाजारपेठेतील चढउतार: मागणी आणि किमतीतील चढउतार शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर परिणाम करू शकतात.
  • ३. कीटक आणि रोग: पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी कीटक आणि रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रातील ॲस्टर लागवड शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांमध्ये विविधता आणण्याची आणि या सुंदर फुलांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्याची एक आशादायक संधी देते. सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून आणि बाजारपेठेच्या ट्रेंडबद्दल माहिती ठेवून, महाराष्ट्रातील शेतकरी ऍस्टरची यशस्वीरित्या लागवड करू शकतात आणि या सुंदर फुलांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेऊ शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने