ढग संशोधन केंद्र

Cloud Research Center
ढग संशोधन केंद्र

भारतातील तसेच राज्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. त्यामुळे कमाल तापमान, किमान तापमान, आर्द्रता, धुके, थंडी, वार्‍याचा वेग, सुर्यप्रकाश अशा हवामानाशी संबधित सर्व बाबींच्या तुलनेत पावसाचा अंदाज शेतकर्‍यांना सर्वात जास्त उपयोगी पडणार आहे. त्यासाठी थेट ढगांचाच अभ्यास करायचा ही कल्पना अस्तित्वात आली आणि महाबळेश्‍वर येथील ढग संशोधन केंद्रामुळे ती साकार सुद्धा झाली.

पिकांचे भरघोस उत्पादन काढण्यासाठी सुयोग्य हवामानाची माहिती असणे आवश्यक असते. हवामानला अनुरूप अशी पिके घेणे शक्य व्हावे, याकरिता हवामानात जे काही सुक्ष्म बदल होतात त्यांचा पिकांच्या वाढीवर, अन्नद्रव्य शोषण करण्याच्या क्रियेवर तसेच किडी व रोगांचा होणारा प्रादुर्भाव या सर्व बाबींचा विचार करून बदलत्या हवामानात पिकांची कोणती निगा किंवा काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता विद्यापीठाच्या चार विभागांमध्ये ( पुणे, इगतपुरी, राहुरी आणि कोल्हापूर ) कृषि हवामान सल्ला केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्रामार्फत भारतीय भारतीय हवामान विभागामार्फत वर्तविण्यात येणार्‍या मध्यम मुदतीच्या ( ३ ते ५ दिवस) हवामान अंदाजावर आधारीत कृषी सल्ला देण्यात येतो. हा सल्ला वेधशाळा, हवामान केंद्र किंवा संशोधन केंद्र अशा ठिकाणी गोळा केलेल्या आकडेवारीतून काढण्यात येतो. परंतु आजपर्यंत असा सल्ला शेतकर्‍यांना शेतीचे नियोजन करतांना फारच उपयोगी पडला असे म्हणण्याचे धाडस राज्य सरकारचा कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठे करणार नाहीत. कारण असा सल्ला हा ढोबळ स्वरूपाचा असतो. 

महाबळेश्‍वर येथे ढग संशोधन केंद्र उभारणीसाठी शासनाने ३५ कोटी रूपयांचा निधी दिला असून लवकरच या ठिकाणी संशोधनाचे काम सुरू होणार आहे. हे केंद्र आंतराष्ट्रीय दर्जाचे होणार असून भारत सरकारच्या मान्सून मिशन या कार्य्रक्रमांतर्गत हे ढग संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. महाबळेश्‍वर येथे भरपूर पडणारा पाऊस आणि अतिशय कमी उंचीवरून जाणारे ढग, यामुळे ढग संशोधन केंद्र उभारण्यासाठी महाबळेश्‍वरची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी विमानाच्या माध्यमातून ढगांच्या अंतरंगात जाऊन अभ्यास निरीक्षणे केली जात होती, परंतु असा अभ्यास फारसा व्यवहार्य ठरत नव्हता. महाबळेश्‍वरमध्ये ढग जमिनीवर असतात, त्यामुळे पाऊस आणि ढगांचे संशोधन करण्यासाठी महाबळेश्‍वरसारखे ठिकाण निवडण्यात आले आहे. 

तसेच महाबळेश्‍वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार फुट उंच आहे. शिवाय या ठिकाणी पावसाळ्यातील चार महिन्यांच्या कालावधीत ढग अगदी जमिनीलगत असतात. हे जमिनीलगत येणारे ढग प्रदुषणविरहित असतात आणि ढगांचा येथे चांगल्याप्रकारे अभ्यास होऊ शकतो असे शास्त्रज्ञांना वाटल्यामुळे ही प्रयोगशाळा थंडगार हवेच्या ठिकाणी म्हणजेच महाबळेश्‍वर येथे उभारल्या जाणार आहे. केंद्र सरकारच्या भारतीय उष्णदेशीय वैज्ञानिक संस्था, पुणे या संस्थेमार्फत हे संशोधन केंद्र राबविले जाणार आहे. या संशोधन केंद्रात ढगांमधील बाष्प, तापमान, हवेचा दाब, दिशा, दवबिंंदू, मेघबिंदू, आर्द्रता, त्यांची उंची व लांबी या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी कोट्यावधी रूपयांची उपकरणे बसवण्यात येत आहेत. स्काय इमेजस, रेडिओ मीटर, ऍटोमेटीक वेदर स्टेशन, ग्लोबल पोझिशन सिस्टम रेडिओ सॅन्डो, फॉग कलेक्टर अशी ही सर्व उपकरणे परदेशातून मागविण्यात आली आहेत.

ढगांच्या अभ्यासाचा भारतात पहिल्यांदा विचार झाला असे नसून या अगोदर कृत्रिम पाऊस पाडतांना ढगांचा अभ्यास करण्यात आला होता. भारतात १९५७ मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याची सुरूवात झाली. उत्तर प्रदेशातील रिहाद जलाशय परिसरात असा कृत्रिम पर्जन्यधारणेचा प्रयोग पहिल्यांदा झाला. त्यानंतर कर्नाटक, आंघ्रप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली , राजस्थानसारख्या राज्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृत्रिम पर्जन्यधारणेचा प्रयोग केला आहे. महाराष्ट्रात कृत्रिम पर्जन्यधारणेचा पहिला प्रयोग प्रकल्प वर्षा या नावाने १५ सप्टेंबर ते १४ डिसेंबर २००३ या कालावधीत राबविण्यात आला. यासाठी वेदर मॉडिङ्गिकेशन इन्कॉर्परेटेड कंपनीशी करार करण्यात आला होता. यासाठी नऊ जिल्ह्‌यांची (सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि औरंगाबाद) निवड करण्यात आली होती. या कृत्रिम पावसाच्या तंत्रज्ञानामुळे तेव्हा राज्यात विविध ठिकाणी २ मि.मी. ते १२२.६ मि.मी. एवढा पाऊस पडला. तेव्हा शासनाने या प्रकल्पावर ६.७ कोटी रूपयाचा खर्च केला. त्यानंतर २० जून २००४ पासून १७ ऑक्टोबर २००४ पर्यंत सुमारे १२० दिवस राज्यात कृत्रिम पर्जन्यधारणेचाप्रयोग करण्यात आला. यासाठी बारामती आणि शेगाव येथे रडार केंद्रे उभारण्यात आली. 

या केंद्रांवरून अनुक्रमे ६४ आणि ६२ दिवस प्रयोग करणे शक्य झाले. राज्यात २४ जिल्ह्‌यांतील ४६६२ गावांना याचा लाभ झाला आणि तेथे ५ मि.मी. ते १३५ मि.मी. एवढा पाऊस पडला. कृत्रिम पावसाचा असा प्रयोग काही ठिकाणी यशस्वी ठरला असलातरी मोठा खर्च असल्यामुळे हा प्रयोग कायम सुरू ठेवणे सरकारला शक्य झालेले नाही. महाबळेश्‍वर येथील ढग संशोधन केंद्रामुळे प्रयोगशाळेत ढगांचा अभ्यास होणार आहे. तसेच एकाच ठिकाणी पडणारा अधिक पाऊस हा दुष्काळी भागाकडे कसा नेता येईल या महत्त्वाच्या गोष्टीचे संशोधन या ठिकाणी केले जाणार आहे. तसेच महाबळेश्‍वरमध्ये सरासरी पाच हजार सी.सी. पाऊस पडतो, तर याच जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्यांमध्ये पाऊस पडत नाही ही एकाच ठिकाणची विषमता कशामुळे आहे, पावसाळ्यातील ढगांचा वेग, दिशा यांची निर्मीती अशा अनेक प्रश्‍नांबाबत या संशोधन केंद्रात काम होणार आहे.

भारतातील कृषीच्या व्यवस्थेसाठी पावसाचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे या केंद्राचा उपयोग कृषी क्षेत्राला होणार आहे. पावसाचा लहरीपणा दरवर्षी वाढत आहे. राज्यातील पावसाच्या एकूण सरासरीचा पाऊस विचारात घेता पाऊस कमी पडतो, असे म्हणता येणार नाही, परंतु राज्यातील काही भागातील ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ हे सुद्धा नजरअंदाज करून चालणार नाही. म्हणजेच राज्यातील काही भागात भरपूर पाऊस पडतो, मात्र काही भागात पाऊस पडत नाही, असे का? काही भागातील पाऊस एकूण सरासरी इतका पडला तरी तेथील शेतीचे उत्पन्न कमी का, पावसाची वांवारिता या साठी कशी जबाबदार आहे, याची कारणे या संशोधन केंद्रात शोधली जाणार आहेत. तसेच या केंद्रात ढगामध्ये पाण्याचे प्रमाण किती आहे, त्याची मोजणी, थेंब कशा प्रकारचे आहेत यांचे संशोधन होणार आहे. यामधून हवामानाचा अंदाज अचूकपणे वर्तविण्यास मदत होणार आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही, पण आता या संशोधनातून दुष्काळी भागात पाऊस पाडता येईल का हे अभ्यासले जाणार आहे. त्यामुळे पावसाचे निदान सोपे होऊन शेतकर्‍यांना ठोस स्वरूपाचे पावसाचे अंदाज उपलब्ध होतील, या अंदाजावरून शेतकर्‍यांना पेरणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी आणि कापणीचे नियोजन करता येईल. 

पेरणी झाल्यावर पाऊस न् आल्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणे, फवारणी झाल्यावर जोर्‍यात पाऊस आल्यामुळे फवारणीचा खर्च वाया जाणे किंवा कापणी झाल्याबरोबर अचानक पाऊस आल्यामुळे शेतमाल शेतातच खराब अशा घटना पावसाच्या अचूक अंदाजामुळे टाळता येतील. अशा केंद्राचा शेतकर्‍यांना निश्‍चितच फायदा होईल, यात दूमत नसलेतरी या केंद्रातून आलेला अंदाज किंवा सल्ला शेतकर्‍यार्ंयंत योग्य वेळेवर आणि त्यांना समजेल अशा भाषेत पोहोचल्यास हे ढग संशोधन केंद्र शंभर टक्के यशस्वी होऊ शकेल.
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने