विदर्भात संत्रा वायनरीची गरज

Need for Orange Winery in Vidarbha
Need for Orange Winery

वाईनबाबत आपल्या समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. ते कसेही असलेतरी वाईन उद्योगाला शासनाने नेहमीच पाठींबा देण्याचे धोरण अवलंबले आहे. परंतु फक्त द्राक्ष फळाच्याच वाईनलाच या धोरणाचा फायदा मिळाला. त्यामुळे द्राक्ष पिकविणार्‍या प्रदेशातील शेतकर्‍यांचा विकास झाला. लोकांनी सुद्धा द्राक्षाच्याच वाईनला पसंती दिली, कारण त्यांच्यापुढे दुसरा ठोस पर्याय उपलब्ध नव्हता. परंतु आता संत्र्यापासून देखील उत्तम प्रकारची वाईन बनू शकते आणि तशी वाईन बनविणार्‍या उद्योगाला चालना दिल्यास विदर्भातील संत्रा फळ बागायतदारांचा उत्तम आर्थिक विकास साधता येउ शकतो, अशी मागणी विदर्भातील शेतकर्‍यांकडून होऊ लागली आहे.

संत्र्यापासून वाईनकडे: विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट

भारताच्या मध्यभागी वसलेला, महाराष्ट्राचा विदर्भ प्रदेश हा उत्कृष्ट लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन करणाऱ्या संत्र्याच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. आदर्श हवामान आणि सुपीक मातीमुळे, विदर्भ हे संत्रा पिकवणारे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे, ज्याचा भारताच्या संत्रा उत्पादनात मोठा वाटा आहे. तथापि, तेथे संत्र्याचे प्रभावी उत्पादन असूनही, या प्रदेशातील संत्रा उद्योगाला बाजारातील चढ-उतार, नाशवंतपणा आणि मर्यादित मूल्य- यासह महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागतो. भारतीय वाइन उद्योगात झपाट्याने वाढ होत असल्याने, विदर्भातील संत्रा उत्पादकांना वाइनमेकिंगमध्ये विविधता आणण्याची एक अप्रयुक्त क्षमता अस्तित्वात आहे. या प्रदेशातील संत्रा वाईनरी स्थानिक अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणू शकते, रोजगार निर्माण करू शकते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकते आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देऊ शकते.

खरंतर राज्यातून वाईनची निर्यात करण्यास २००१ मध्ये सुरूवात झाली. त्यावेळी अडीच ते तीन लाख लिटर वाईनची निर्यात झाली होती. जगभरात वाईन निर्मीतीमध्ये इटली,फ्रान्स, जर्मनी हे देश आघाडीवर असलेतरी महाराष्ट्रात तयार होणार्‍या वाईनलाही परदेशात चांगली पसंती मिळत आहे. राज्यात तयार होणार्‍या वाईनची थायलंड, मलेशिया, हॉलंड आणि दुबई याठिकाणी निर्यात होत असते. परदेशात पाठविण्यात आलेल्या वाईनमध्ये रेड वाईनचे प्रमाण ६० टक्के आणि व्हाईट वाईनचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या सद्या ज्या वाईन आहेत त्या द्राक्षापासून तयार केलेल्या असतात. शास्त्रीय पद्धतीने द्राक्ष रसाचे फरमेण्टेशन करून वाईन तयार करतात. वाईनमध्ये फळांची सर्व जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, शर्करा, मेदाम्ले आणि अनेक प्रकारची ऍटीऑक्सीडंट तसेच ८ ते १२ टक्के एवढेच मापक अल्कोहोल असते. म्हणजेच फळांची वाईन दारू नसून फळांचा अल्कोहोलयुक्त रस आहे. त्यामुळे ही वाईन दमा, खोकला, अपचन, पोट जड होणे, भूक न लागणे, तापानंतर येणारा खोकला व अशक्तपणा, फुफ्फुसाचे विकार अशा अनेक व्याधींवर उपयोगी आहे. ही फळांची वाईन इतर अल्कोहोलयुक्त व्हिस्की, रम, ब्रँडी किंवा देशी दारू प्रमाणे आरोग्यास अपायकारक नाही. म्हणूनच उत्तम आरोग्यासाठी जेवणापूर्वी, जेवतांना किंवा जेवणानंतर अल्प प्रमाणात वाईन घेणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्तच असते, असे वाईन संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधकांच्या सुचनेला आपल्या राज्याने फारच सकारात्मक प्रतिसाद दिला, कारण राज्यात वाईनला पसंती देणार्‍या लोकांची संख्या वाढत असून या वाईनला परदेशातून येणारी मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. 

दरवर्षी राज्यातून सुमारे सात ते आठ लाख लिटर वाईनची निर्यात होत असून त्याद्वारे सात ते आठ कोटी रूपयांचे परकीय चलन प्राप्त होत आहे. तसेच दरवर्षी होणार्‍या वाईनच्या निर्यातीत साधारण एक लाख लिटरने वाढ होत आहे. आताच्या स्थितीत भारतात ७४ वायनरी असून त्यापैकी ६८ वायनरी महाराष्ट्रात आहेत. नाशिकमध्ये वायनरीजची संख्या ३४ आहे. दरवर्षी वाईन उद्योगाची २५ टक्के वाढ होत आहे. त्यामुळेच अशा या वाईन उद्योगात सध्या प्रचंड रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

वाईन निर्मीतीला सुरूवातीला चालना देतांना फक्त द्राक्ष फळाचाच विचार करण्यात आला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात द्राक्ष वायनरीचे जाळे तयार झाल्याने तेथील द्राक्ष उत्पादकांची मोठी भरभराट झाली. विदेशात त्याला मोठे मार्केट मिळाले. त्यामुळे वाईन म्हणजे फक्त द्राक्षांचीच असा समज सर्वदूर पसरला, त्यामुळे सुरूवातीला फक्त द्राक्षापासून वाईन निर्मीतीवरच लक्ष्य केंद्रीत झाले. परंतु आता संत्र्यापासूनही वाईन निर्मीतीला चालना देऊन विदर्भातील संत्रा उत्पादक आपला विकास कसा करता येईल यावर गांभीर्याने विचार करू लागले आहेत. कारण आगळीवेगळी चव आणि सुगंध लाभलेल्या नागपुरी संत्र्याला कुठेही तोड नाही. नागपुरी संत्रा संपूर्ण जगात प्रसिद्ध होण्याचे कारण यातच दडलेले आहे. कारण विदेशात हा संत्रा नागपूर ऑरेंज म्हणून ओळखला जातो. विदर्भाचे हे मुख्य फळपीक प्रामुख्याने नागपुर आणि अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बहरले आहे. संपूर्ण विदर्भात सुमारे दीड लाख हेक्टरमध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र मार्केटिंग, पॅकेजिंग तसेच प्रक्रिया उद्योगाच्या अभावामुळे नागपूरचा संत्र्याला हवा तसा बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे कवडीमोल भावाने दर्जेदार संत्रा विकण्याची पाळी दरवर्षी संत्रा उत्पादकांवर येते. नाशिक येथील वाईनरीमुळे जसा द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचा विकास झाला, त्याचप्रकारे संत्र्यासाठी वाईनरी उद्योग नागपूर येथे उभारून संत्रा उत्पादक शेतकर्‍यांचा विकास करण्याबाबत आता शासन गांभीर्याने विचार करित आहे.

संत्र्याची वाईन जपान, मॉरिशससह अनेक देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यापैकी फक्त जपान आणि मॉरिशसमध्येच वायनरी उभारण्यात आलेल्या आहेत. भारतातील एकूण संत्रा उत्पादनापैकी दर्जेदार संत्रा केवळ विदर्भातच उत्पादित होतो. देशात कुठेही इतरत्र संत्रा वायनरी नसल्यामुळे नागपूर जिल्हयात सुरू होणारी ही वायनरी देशातील पहिलीच वायनरी ठरणार आहे. उत्पादीत होणारी जास्तीतजास्त वाईन निर्याय करण्याचे प्रयत्न राहणार आहेत.

संत्र्यापासून वाईन तयार करण्याचे उद्योग विदर्भात सुरू झाल्यास त्यामुळे निश्‍चितच संत्रा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. परंतु वाईनउद्योगामुळे संत्रा फळांना योग्य भाव मिळालातरच संत्रा उत्पादकांना फायदा होणार आहे, कारण साखरकारखान्यासाठी ऊस पिकविणार्‍या शेतकर्‍यांना कमी भाव मिळाल्याने किंवा अनेक साखर कारखान्यांनी ऊस न उचलल्यामुळे जसे ऊस उत्पादकांचे नुकसान झाले, तशा प्रकारची वेळ संत्रा उत्पादकांवर यायला नको. माल निर्यात होत असणे ,केव्हाही चांगले. पण जागतिक स्तरावर देखील स्पर्धा वाढत आहे, तेजी-मदींच्या लाटा अशा या जागतिक स्तरावर नेहमीच मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे संत्रा वाईनसाठी विशिष्ट हमखास अशा बाजाराची निर्मीती आणि ग्राहकांची पसंती कशी निर्माण करता येईल, हे लक्ष्य सुरूवातीला संत्रा वाईनरी उद्योजकांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. कारण हमखास बाजारपेठ आणि विशिष्ट ग्राहकवर्ग निर्माण झाल्यास वाईनरी उद्योग तोट्यात जाऊच शकत नाही. तशी संत्रा वाईनरी उद्योगाला सध्या स्पर्धा नसली तरी इतर फळांपासून वाईननिर्मीती कशी करता येईल असा विचार अनेक उद्योजकांनी सुरू केला आहे. आता स्ट्रॉबेरी, अननस, आंबे, काजू, महुआ, पेरु, बोरे, अंजिरे या फळांपासून वाईन निर्मीती करण्याचे तंत्र विकसित झाले असून त्यापासून व्यावसायिक दृष्ट्या वाईन निर्मीती करण्याचे प्रयत्न काही उद्योजकांनी सुरू केले आहेत. त्यासाठी विदर्भातील संत्र्यापासून वाईनरी निर्माण करणार्‍या उद्योजकांनी आपले संत्र्यापासून वाईन तयार करण्याचे उद्योग लवकरात लवकर उभारून हमखास बाजारपेठ निर्माण करण्याची वेळ आली आहे. कारण वाईन पिणारे लोक चवीबाबत फारच जागरूक असतात, दुसरी चव जर त्यांच्या तोडांत आलीतर संत्र्याच्या वाईनला ग्राहक मिळणे कठीण होईल. परदेशातील काही कंपन्यांनी स्ट्रॉबेरी वाईनचा एक खास ग्राहक वर्ग पुण्यात निर्माण करणे आणि पुण्यातच स्ट्रॉबेरी वाईनची मोठ्या प्रमाणात विक्री करून दाखविणे, हे त्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे.

केवळ वाईन उद्योगला चालना देण्याचे धोरण न राबविता सरकारने वाईनची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत, असे वाईन उद्योजकांचे म्हणणे आहे. फ्रान्स, इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या वाईन उत्पादक देशांत वाईन टुरिझम लोकप्रिय आहे. आपल्या देशात सध्या ऍग्री टुरिझमची नुकतीच सुरूवात झाली आहे, त्यासोबत वाईन टुरिझमची पृष्ठी दिल्यास वाईनसाठी खास वर्ग निर्माण होऊ शकेल. तसेच परदेशात जसे वाईन लव्हर्स क्लब असतात, त्याचप्रमाणे आपल्या देशात क्लब उभारण्यासाठी चालना मिळायला हवी. वाईनबारच्या मार्केटिेंगवाढीला परवाना मिळण्याबाबतच्या किचकट अटी कमी करणे, वाईनबारच्या परवान्यासाठी लागणारी फी कमी करणे, वाईनबाबत आणि त्यापासून आरोग्याला मिळणार्‍या फायद्याबाबत समाज जागृती करणे, वाईनबारसोबत इतर दुकानांमध्ये सुद्धा वाईन विक्रीस परवानगी देणे याप्रकारचे शासनाचे काही प्रयत्न वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. बाजारपेठेत प्रथम या आणि प्रथम कमवा या नियमानुसार विदर्भातील उद्योजकांनी सर्व धोक्याच्या आणि जमेच्या बाजू अभ्यासून संत्र्यापासून वाईन निर्मीती उद्योगाला त्वरीत चालना दिल्यास ते नक्कीच यशस्वी उद्योग उभारू शकतात, यात शंका नाही.

Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने