दिव्यांग मुलीशी लग्न करण्यामागील खरे कारण

reason-behind-marrying-a-disabled-girl
Why marry a disabled girl?     Image generated by Meta AI

डॉक्टर अरूण पोतदारांचे नाव माहीत नाही, असा एक व्यक्ती त्या शहरात बहुधा नसावा. कमी वेळात जबरदस्त प्रसिद्धी, सर्जरीतील नैपुणता आणि कोणत्याही प्रकारची गुंतागुंतीची सर्जरी करण्यात एक्सपर्ट तरूण डॉक्टर म्हणून अरूण प्रसिद्ध होता. परतुं त्याच्या आणखी एका निर्णयाने सर्व शहरवासी चकीत झाले. कारण अरूणने अचानक एका अपंग मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. 

दिव्यांग मुलीशीच लग्न का?

गेल्या आठवड्यातच मानसी नावाच्या एका तरूण मुलीने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून तिला अरूणच्या हॉस्पीटलमध्ये ऍडमीट केले होते. अरूणने आपले सर्वप्रकारचे प्रयत्न करून मानसीची अतिशय चांगल्याप्रकारे काळजी घेतली. ती सातच दिवसात व्यवस्थित बोलू लागली. मानसीचा विवाह ठरला होता. खरंतर ती अपंग असल्यामुळे तिचा विवाह ठरत नव्हता. परंतु एका ठिकाणी भरपूर हुंडा देण्याच्या अटीवर तिचा विवाह ठरला होता. परंतु विवाहाच्या १० दिवस अगोदर वराकडच्या मंडळीने आणखी हुंडा मागितला, तो हुंडा देण्याची क्षमता नसल्याचे जेव्हा मानसीच्या वडीलांनी कळविले. तेव्हा विवाह मोडला गेला आणि वराकडील मंडळींनी अगोदर दिलेला हुंडा परत देण्याचे सुद्धा नाकारले, हे सर्व मानसीकडून सहन न झाल्यामुळे तिने विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. कारण आपण अंपग असल्यामुळे आपल्या घरच्यांना होणारा त्रास तिच्याकडून बघविला गेला नाही.

याअगोदर सुद्धा असे पेशंट अरूणच्या दवाखान्यात आले होते. परंतु अरूणने कोणत्याही पेशंटमध्ये भावनिक गुंतवणूक केली नव्हती, परंतु मानसी आणि तीसुद्धा अपंग असतांना सुद्धा अरूण तिच्याशी विवाहास तयार झाला. अरूणच्या आईवडीलांनी खूूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु अरूणने कोणाचेही ऐकले नाही. मानसीला आणि मानसीच्या आईवडीलांना अरूणसारख्या चांगल्या स्थळाला नकार देण्याचा प्रश्‍न नव्हता. विवाह थाटामाटात झाला. सर्व शहरवासीयांनी अरूणचे कौतुक केले, वर्तमानपत्रात त्याच्या कौतुक करणार्‍या भरपूर बातम्या आल्या.

अरूण आणि मानसीच्या विवाहास आता दोन वर्षे पूर्ण झाली. मानसीही शिकलेली असल्यामुळे तिनेसुद्धा हॉस्पीटलच्या व्यवस्थापनात थोडेफार लक्ष दिले होते. परंतु आपल्याशी विवाह करून अरूणने आपल्यावर खूप उपकार केले आहे, याच भावनेने मानसी जगत होती. एक दिवस मात्र मानसीचा तिच्या सासू सासऱ्याकडून तिच्या अपंगत्चाला हिणवून अपमान करण्यात आला. याअगोदर सुद्धा असे प्रसंग आले होते, परंतु तिने सर्व सहन केले होते. पण आज मात्र तिच्याकडून सहन झाले नाही, तिने हिम्मत करून अरूणला सर्व सांगितले. अरूणने सर्व ऐकून घेतल्यावर कोणाला काही समजावण्याच्या ऐवजी घरात एक पार्टी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 

मानसीसाठी पार्टीचे आयोजनामागील खरे कारण 

मानसीला पार्टीचे आश्‍चर्य वाटले. पण तिने पार्टीची सर्व तयारी केली. जवळच्या मित्र-मंडळींना आणि नातेवाईकांना निमंत्रणे दिली गेली. पार्टी शहरातील सर्वात मोठ्या हॉलमध्ये सुरू झाली. सर्व मोठे डॉक्टर, लोक प्रतिनिधी आणि नातेवाईक पार्टीला हजर होते. पाटी ऐन रंगात असतांना, अरूणने माईक हातात घेतला आणि सर्वांचे लक्ष वेधले. तो म्हणाला, खरंतर आज पार्टी एका विशेष कारणासाठी आयोजित करण्यात आली आहे. ते कारण म्हणजे सत्यकथन. कारण मी मानसीशी विवाहाचा निर्णय घेतल्यावर सर्वांना आश्‍चर्य वाटले. सर्वांनी मी एका अपंग मुलीशी विवाह केला म्हणून या माझ्या कार्याला एक महान कार्य म्हणून संबोधले. परंतु मित्रांनो, हे खर नव्हे. कारण सत्कार आणि गौरव माझा नाही तर माझ्या पत्नीचा म्हणजे मानसीचा व्हायला हवा. तिच्यामुळेच आज मी एम डी करून एवढा मोठा डॉक्टर होऊ शकलो. 

सहा वर्षापूवी आजच्याच दिवशी मला रात्रीच्या फ्लाइटने एम डी करायला विदेशात जायचे होते, मी संध्याकाळी त्याच खूशीत शॉपिंग करून परत येतांना माझ्या बाईकचा धक्का एका मुलीला लागला. ती मुलगी रस्ताच्या बाजूला फेकली गेली. मी जेव्हा मागे वळून पाहिले, तेव्हा ती मोठ्या अपेक्षेने मदतीच्या आशेने माझ्याकडे बघत होती, तिचा तो रक्ताळलेला पाय, वेदनेयुक्त आवाज आणि पाणावलेले डोळे माझ्याकडे पहात होते. त्या क्षणाला माझी बंद पडलेली बाईक नेमकी कीक मारून सुद्धा सूरू होत नव्हती. रात्री विमानाने विदेशात जायचे असल्यामुळे उगाचच झंझट नको म्हणून मी तेथून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही क्षणात ती मुलगी सावरली आणि आरडाओरडा करायला लागली, मी हिम्मत करून त्या मुलीकडे गेलो आणि तिला ओरडू नको असे सांगितले आणि ती जर ओरडली आणि लोकं गोळा झालीतर मी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाउ शकणार नाही असे तिला सांगितले. तिने माझी विनंती मान्य केली. मी लगेचच मदतीला कोणालातरी पाठवतो असे सांगून बाईक कशीतरी चालू करून तेथून कसाबसा पळ काढला. माझ्या डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे ती मुलगी माझा चेहरा बघू शकली नाही. त्यानंतर एम डी चे शिक्षण आणि भारतात आल्यावर रोजचे ऑपरेशन यामुळे मला या घटनेचा विसर पडला. पण जेव्हा दोन वर्षापूर्वी एक युवती माझ्या दवाखान्यात ऍडमीट झाली आणि तिचे पाणावलेले डोळे पाहून मला ही घटना एकदम आठवली. तेव्हा मित्रांनो स्वत:वर अपघात झालेला असतांना सुद्धा माझ्या उच्चशिक्षणाची संधी निसटू नये म्हणून ती चूप राहणारी मुलगी आणखी कोणी नसून माझी ही मानसीच होती. खरंतर मी तिच्यावर नाहीतर तिनेच माझ्यावर उपकार केले आहेत. 

आपल्याशी लग्न करण्यामागील खरे कारण ऐकून मानसीचे अश्रू अनावर झाले, अरूणचे आईवडील खाली मान घालून उभे होते. कारण अरूणने विमानात बसतांना त्यांना त्या मुलीचा शोध घेऊन तिला मदत करण्यासंबधी सूचना दिल्या होत्या. अरूण कसातरी आपल्या भावना आवरून पुढे म्हणाला, आज लोकं मानसी अपंग आहे म्हणून तिच्याकडे घृणेने बघता खरतर तिच्यामुळेच आज मी इतका सक्षम झालो की कितीतरी अपंग पेशंट माझ्या ट्रिटमेंटमुळे बरे झाले. तेव्हा तुम्हीच ठरवा, उपकार कुणी कोणावर केले, कौेतुकास कोण पात्र आहे?

Yogesh Ramakant Bholane

Director, Nikant Classes, Dhule | Contact: +91 9881307618. I am a passionate professional writer, crafting engaging articles on diverse topics like current affairs, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues for newspapers, magazines, and digital platforms. With over 20 years as a District-Level Trainer at the Maharashtra Centre for Entrepreneurship Development (MCED), I’ve delivered hundreds of training sessions, inspiring and guiding thousands of young entrepreneurs across Maharashtra. I’m also skilled in video editing, VFX, website development, and blogging, bringing creativity and technical expertise to every project. At Nikant Classes, we empower students with courses for Scholarship, NTS, MTS, Manthan, Jawahar Navodaya, and regular classes for State Board, CBSE, and ICSE.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने