शेतीपासून ग्राहकापर्यंत कृषी उत्पादनासाठी हवे नवीन विक्री मॉडेल्स

Innovative Sales Methods in Agriculture
शेतमाल विक्रीसाठी नवीन पद्धतींची गरज

आपला देश शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे साहजिकच त्यातील सर्व राज्ये शेतीप्रधान आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्राचा आणि देश कृषिप्रधान असल्याने संपूर्ण देशाचा आर्थिक विकास हा शेतमालाच्या किंमतीवर किंवा शेतमालाच्या किंमतीच्या स्थिरीकरणावर अवलंबून आहे. शेतमालाच्या किंमतीत फार मोठ्या प्रमाणावर जर चढउतार होऊ लागले तर त्याचे दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांचेच नव्हेतर देशाचे आणि केवळ एका देशाचे नव्हे तर अनेक देशांचे नुकसान होते. सर रॉजर थॉमस यांच्या मते तर पावसाच्या खालोखाल शेतमालाच्या किंमती हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे.

शेतमाल विक्रीसाठी नवीन पद्धतींची गरज

शेतमालाच्या किमती ठरविणे, सद्यस्थितीत तरी आपल्या शेतकऱ्यांच्या हातात नाही. परंतु शेतमाल विक्री करतांना जर योग्य काळजी घेतली तर शेतकरी आहे त्या वर्तमानस्थितीतील चांगला बाजारभाव मिळवू शकतो. जर शेतमाल विक्री करतांना निष्काळजीपणा झाल्यास शेतकऱ्याला जबरदस्त नुकसान सोसावे लागते. या परिस्थितीत शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकणे, रस्ता रोको करणे आदी प्रकार करून निषेध व्यक्त करतात. परंतु यामुळे मूळ समस्या सुटत नाही, केवळ आपल्या समस्येला प्रसिद्धी मिळते. म्हणून शेतमाल विक्री करण्याच्या सध्या उपलब्ध पद्धती आणि त्यात कसे आणि कोणते नवीन बदल आणता येतील, नवीन पद्धती निर्माण करता येतील याबाबातीत संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेतमाल विक्री करण्याच्या प्रचलित पद्धती

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे शेतमाल विक्री करण्याच्या काही विशिष्ट पद्धती प्रचलित आहेत. त्यापैकी उघड लिलाव पद्धत नियंत्रित बाजारपेठेत सर्वत्र आढळते. 

उघड लिलाव पद्धत

उघड लिलाव पद्धतीमध्ये शेतकरी त्यांचा माल बाजारपेठेत आणून विकण्यास तयार ठेवतात आणि तेथे असणारे अधिकृत दलाल माल विकत घेण्याची हमी घेतात. त्याचप्रमाणे बाजारपेठेत मालाची खरेदी करणारे व्यापारी सुद्धा असतात. दलाल शेतकऱ्यांतर्फे  किंमत बोलतो व जो व्यापारी जास्तीतजास्त किंमत देईल, त्यास माल विकला जातो. दलाल त्याच्या कामाचा मोबदला दलालीच्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून किंमतीच्या काही ठराविक प्रमाणात घेतो. या पद्धतीचा प्रमुख फायदा म्हणजे शेतमालाची किंमत व वजन शेतकऱ्यांसमोर होते आणि ताबडतोब त्याचा हिशोब त्याला मिळतो. परतुं बऱ्याचवेळा माल खरदी करणारे व्यापारी संगतमत करून मालाच्या किंमती कमी करतात, हा या व्यवस्थेचा महत्त्वाचा तोटा आहे.

शेतमाल विक्रीची फायदेशीर वाटाघाटाची पद्धत

शेतकऱ्याच्या दृष्टीने फायदेशीर म्हणून वाटाघाटाची पद्धत समजली जाते. या पद्धतीमध्ये शेतकरी आणि खरेदी करणारे व्यापारी यांच्यात कुठल्याही दलालाविना वाटाघाटी होऊन शेतमालाची एक किंमत ठरते. परंतु नंतर वाटाघाटी फिसकटणे, शेतमाल ताब्यात घेतल्यानंतर व्यापाऱ्याने पैसे वेळेवर न देणे असे प्रकार यापद्धतीत घडल्यास शेतकऱ्याला कोणीच वाली नसतो.

शेतमाल विक्रीची जलप पद्धत

जलप पद्धतीत उभ्या पिकाचे अपेक्षित उत्पन्न लक्षात घेऊन आणि त्या अंदाजावरून विक्री केली जाते. याशिवाय शेतमालाच्या विक्रीसाठी त्यांची संपूर्ण माहिती देऊन नमुना दाखवून आणि बंद निविदा मागवून दरपत्रकाच्या आधारे मालाची विक्री केली जाते. परंतु या पद्धतीचा अवलंब विशेषत: फळे व फुलांच्या बाबतीतच काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात आढळतो.

शेतमाल विक्रीची हत्ता पद्धत

शेतकऱ्यांची पिळवणूक करणारी आणि कायद्याने बंदी असतांना सुद्धा काही ठिकाणी वापरली जाणारी गुप्त किंवा हत्ता पद्धतसुद्धा प्रचलित आहे. या पद्धतीमध्ये दलाल व व्यापारी यांच्यामध्ये हाताच्या बोटांच्या खुणेने व्यवहार होतात. हातावरती रूमाल असतो, त्यामुळे दलाल व व्यापारी यांच्यामध्ये काय किंमत ठरते त्याची शेतकऱ्याला कल्पना नसते. दलालाचे ठरलेले कमिशन शेतकऱ्यास द्यावे लागतेच शिवाय दलाल मध्येच बराच नफा  घेत असल्यामुळे ही पद्धत शेतकऱ्याचे नुकसान करणारी ठरते.

Sale of agricultural produce through agricultural exhibition
कृषि प्रदर्शनातून शेतमाल विक्री

धान्य महोत्सव, तांदूळ महोत्सव, आंबा महोत्सवाद्वारे शेतमाल विक्री

उघड लिलाव पद्धत, वाटाघाटाची पद्धत, जलप पद्धत आणि गुप्त पद्धत अशा चार प्रकारच्या शेतमाल विक्रीच्या पद्धतींवरच लक्ष केंद्रीत करून आतापर्यंत शेतमाल विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. या सर्व पद्धतीत फायदे आणि तोेटेसुद्धा आहेत. खरतर काळानुरूप यातील काही पद्धती आतापर्यंत बाद व्हायला हव्या होत्या. परंतु आजदेखील या चारही पद्धतींचे आस्तित्व अनेक ठिकाणी आढळते. शासनाने या पद्धतीत बदल करण्याचे, हत्ता पद्धतीवर बंदी आणण्याचे प्रयत्न केले, परंतु असे प्रयत्न शेतकऱ्यांचा शेतमाल योग्य आणि सुरक्षितपणे विकला जाईल याची हमी घेण्याइतपत पुरेसे ठरले नाहीत. शासन या पद्धतींमध्ये वेळोवेळी सुधार करेलच, यात शंका नाही. परंतु त्यासोबत आणखी कोणत्या प्रकारे शेतमाल विकता येईल याचा विचार सुद्धा शासनाने करायला हवा. शेतमाल विक्रीच्या नवनवीन पद्धती संशोधित करून त्यांना अधिकृतपणे मान्यता देऊन अशा पद्धतींना जास्तीतजास्त प्रसिद्धी द्यावयास हवी. गेल्या काही वर्षांपासून शेतमाल विक्रीसंबधी काही ठिकाणी महोत्सव आयोजित केले जातात. जसे धान्य महोत्सव, तांदूळ महोत्सव, आंबा महोत्सव असे महोत्सव, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आणि कृषि विद्यापीठ यांच्या नियंत्रणाखाली राज्यात काही ठिकाणी नियमीतपणे आयोजित केले जात आहेत.

धान्य महोत्सव, तांदूळ महोत्सव, आंबा महोत्सवाद्वारे शेतमाल विक्रीची वैशिष्ट्ये 

  • या महोत्सवांमुळे ग्राहकांना दर्जदार धान्य, फळे व भाजीपाला योग्य दरात उपलब्ध होतो. 
  • शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांच्या हातात जातो. 
  • या महोत्सवांमध्ये शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरविण्याचा अधिकार मिळतो. 
  • शेतमाल विकतांना शेतकऱ्यांना दलाल, मध्यस्त किंवा व्यापारी असे अडथळे पार करावे लागत नाही. 
  • विशेष म्हणजे अशा महोत्सवांना राज्यात सर्वत्र नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 
  • वाजवी किंमतीत शेतीतून थेट आलेला शेतमाल मिळत असल्यामुळे ग्राहक वर्षाभराची धान्य खरेदी आता या महोत्सवातून करायला लागली आहेत. 
  • परंतु या व्यवस्थेचा प्रमुख एक तोटा म्हणजे असे महोत्सव हंगामी स्वरूपातच आयोजित केले जातात. 
  • त्यावेळी ज्या शेतकऱ्यांचा माल तयार असेल त्यांनाच लाभ उठवता येतो 
  • तसेच हे उत्सव स्वत: शेतकरी आयोजित करीत नाही. शासन, विद्यापीठ किंवा एखादी संस्था जेव्हा पुढाकार घेते, तेव्हाच असे उत्सव आयोजित होऊ शकतात. 

असे उत्सव प्रत्येक हंगामात किंवा प्रत्येक महिन्यात आयोजित होण्यासाठी शेतकर्‍यांनी स्वत: संघटीत होऊन पुढाकार घ्यायला हवा. अशा उत्सवासाठी शेतमाल विक्री करण्यासाठी शेतमालाचे व्यवस्थित ब्रॅण्डींग करावयास हवे. तरच असे उत्सव यशस्वी होतील.

कृषि पर्यटनातून शेतमाल विक्री

कृषि पर्यटनातून ताज्या आणि उपलब्ध शेतमालाची विक्री ही सुद्धा एक नवीन शेतमाल विक्रीची पद्धत आता जोर धरू लागली आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शहरातील पर्यटक गावाकडील शेतांना भेटी देतात. गावातील शेतात येऊन प्रदुषणमुक्त वातावरणाचा आनंद घेतात, अशावेळी शेतकर्‍यांनी शेतातील उपलब्ध शेतमाल, भाजीपाला, फळे आणि फुले रास्त दरात अशा शहरातील पर्यटकांना खरेदी साठी उपलब्ध केला पाहिजे. कृषि पर्यटनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पैसा मिळतोच पण त्यासोबत शेतमाल विकल्यास किंवा शेतमालावर प्रक्रिया केलेले पदार्थ विकल्यास आणखी जास्त पैसे शेतकर्‍यांना कुठेही बाहेर न जाता शेतातच मिळू शकतील. म्हणूनच शासनाने आता त्याच त्या शेतमालविक्री पद्धतींवर संशोधन आणि दुरूस्तीसोबतच धान्य महोत्सव आणि कृषि पर्यटनातून शेतमाल विक्री अशा नवीन विक्री पद्धतींचा अभ्यास करून अशा पद्धतींना त्वरीत प्रोत्साहन द्यावयास हवे.

शेवटी, आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या बाजारपेठेत पारंपारिक कृषी विक्री मॉडेल पुरेसे नाही. तंत्रज्ञानाच्या वाढीसह आणि ग्राहकांच्या पसंती बदलत असताना, शेतकरी आणि उत्पादकांनी स्पर्धात्मक राहण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. "फार्म टू कन्झ्युमर" दृष्टीकोन एक आशादायक उपाय ऑफर करतो, मध्यस्थांना काढून टाकतो आणि उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडतो. ऑनलाइन शेतमाल विक्री, धान्य महोत्सव, तांदूळ महोत्सव, आंबा महोत्सव असे कृषी कार्यक्रम आणि थेट ग्राहक विक्री यासारखे नवीन विक्री मॉडेल स्वीकारून, शेतकरी त्यांचा नफा वाढवू शकतात, ब्रँड निष्ठा वाढवू शकतात आणि ताज्या, स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करू शकतात. याव्यतिरिक्त, या नाविन्यपूर्ण पध्दतीमुळे अन्नाचा अपव्यय कमी करण्यात मदत होऊ शकते, शाश्वत शेतीला पाठिंबा मिळू शकतो आणि अन्न सुरक्षेला प्रोत्साहन मिळू शकते.
Yogesh Ramakant Bholane

Director, Nikant Classes, Dhule | Contact: +91 9881307618. I am a passionate professional writer, crafting engaging articles on diverse topics like current affairs, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues for newspapers, magazines, and digital platforms. With over 20 years as a District-Level Trainer at the Maharashtra Centre for Entrepreneurship Development (MCED), I’ve delivered hundreds of training sessions, inspiring and guiding thousands of young entrepreneurs across Maharashtra. I’m also skilled in video editing, VFX, website development, and blogging, bringing creativity and technical expertise to every project. At Nikant Classes, we empower students with courses for Scholarship, NTS, MTS, Manthan, Jawahar Navodaya, and regular classes for State Board, CBSE, and ICSE.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने