बेकायदेशीरपणे रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचे धोके

Risks of Crossing Railway Tracks Illegally
बेकायदेशीरपणे रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचे धोके

एक इंग्रजी चित्रपट नुकताच पाहण्यात आला. त्यातील कॉलेज कुमार एका विशिष्ट इमारतीच्या बाल्कनीजवळ आल्यावर खाली ढूकून बघतात, थोडे जास्त, थोडे जास्त असे वाकून त्या विशिष्ट बाल्कनीवरून आपला जीव देतात. त्या बाल्कनीच्या कठड्यावरून जास्त वाकून खाली बघितले तर तोल जाऊन आपला जीव जाऊ शकतो, हे माहीत अतांनासुद्धा तेथे आल्यावर कॉलेजकुमार जीव देतात. त्या चित्रपटात अशा चार सलग घटना होतात, आणि त्या विशिष्ट इमारतीच्या बाल्कनीतच आल्यावर अशा घटना का होतात, त्यामागील कारण शोधण्यावर हा संपूर्ण चित्रपट आधारित होता. वाचकांना आता त्या चित्रपटाचे नाव जाणून घेण्याची ईच्छा झाली असेल, कारण फक्त चारच तरूण बाल्कनीतून पडून मेले या सत्य घटनेवर आधारित तो चित्रपट निर्माण करण्यात आला होता. परंतु तो चित्रपट पाहण्यापेक्षा जर आपण आपल्या देशातील रेल्वे स्टेशन्स जर अभ्यासले तर असे दोन-चार नाहीत तर हजारो मृत्यू आपल्या देशात अगदी सहजपणे होत असतात.

रेल्वे रूळ असुरक्षितपणे ओलांडणे चिंताजनक

प्रवाशांना माहीतअसते की रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पादचारी पुलाची सोय आहे, त्यांना माहीत असते की याअगोदर हा रूळ ओलाडतांना अपघात झाले आहे, त्यांना माहीतअसते की हे रूळ ओलाडतांना अचानक सर्वच ट्रकवर रेल्वेगाडी येऊ शकते आणि आपल्याला जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागाच राहणार नाही, त्यांना माहीत असतेकी या अगोदर त्यांच्या डोळ्यासमोर रूळ ओलांडतांना अनेक प्रवाशांनी जीव गमावला आहे, तरीसुद्धा आपण ही अशाच प्रकारे असुरिक्षितपणे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करायचा आणि आपला जीव द्यायचा. सर्व धोके माहीत असतांना देखील अतिशय क्षुल्लक कारणासाठी धोका पत्करून जीव देण्याच्या घटना बहुधा आपल्या देशातच होत असाव्यात. परंतु घाईत रेल्वे ट्रॅक ओलांडतांना गाडीखाली सापडून जीव जाणे केवळ हेच रूळांवरील मृत्यूचे एकमेव कारण नाही. तर गाडीतून पडून किंवा टपावरून मृत्यू होणे, रेल्वे मार्गावरील खांबावर आदळून तसेच रेल्वे गाडीखाली आत्महत्या ही कारणे देखील आहेत.

एका प्लेटफॉर्मवरून दुसऱ्या प्लेटफॉर्मवर सुरक्षितपणे जाण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशन्सवर सोयी उपलब्ध केल्या आहेत. कितीही घाई असलीतरी सरळपणे रेल्वे रूळांवर उतरून रेल्वेचा ट्रॅक ओलांडू नये, असे प्रत्येक रेल्वे स्टेशन्सवर रेल्वे प्रशासन दररोज लाऊडस्पीकरवर आवाहन करत असते. तरीसुद्धा असुरक्षितपणे रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रमाण आजही चिंताजनक आहे. बहुधा ते दरवर्षी वाढतच आहे. रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांना डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय समितीने सादर केलेल्या अहवालानुसार देशात दरवर्षी किमान १५ हजार मृत्यू रेल्वे रूळ ओलांडतांना होत आहेत. यातील ४० टक्के मृत्यू हे फक्त मुंबई उपनगरीय रेल्वेच्या रूळांवरतीच होत असल्याचे आढळले आहे. या अहवालानुसार रेल्वे प्रवाशांचा खासकरून मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. याच अहवालात म्हटले आहे की रेल्वे ट्रॅकवर २००२ ते २०११ या कालावधीत मुंबईच्या रेल्वे रूळांवर तब्बल ४० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे तेवढेच नागरिक रूळ पार करतांना जखमी झाले आहे.

Lifeline become Life-ender
Lifeline become Life-ender

जीवनवाहिनी बनली जीवननाशिनी

देशात मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये रेल्वे खात्यामार्फत उपनगरी गाड्या चालविल्या जातात. अस्ताव्यस्त पसरलेल्या या महानगरात आणि त्यांना जोडणाऱ्या उपनगरांतील प्रवाशांच्या सोयीसाठी ज्या उपनगरी गाड्या धावतात, त्याखाली सापडून म्हणजे रेल्वे रूळावर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कारणपरत्वे भिन्न असलेतरी भयावह आहे. रेल्वे मंडळाकडून मिळालेल्या आणखी एका माहितीनूसार २००३-०४ ते २००७-०८ या पाच वर्षात मुंबई उपनगरी रेल्वे रूळांवर १८ हजार ७३८ जण मृत्यूमुखी पडले, तर दिल्लीत याच काळात त्याहून अधिक म्हणजे २१ हजार १३७ जण मृत्यूमुखी पावले. म्हणजे राजधानी दिल्ली सुद्धा रूळांवरील मृत्यूच्या बाबातीत आघाडीवर आहे.

मुंबईत सर्वाधिक मृत्यू प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडून जाण्यापायी होतात. कारण मुंबईकर घड्याळाच्या तालावर धावतात. गाडी पकडतांना एका एका सेकंदाचा त्यांना विचार करावा लागतो. म्हणून झटपट गाडी पकडण्यासाठी सुरक्षितपणे पुलावरून रेल्वे ट्रक ओलांडण्याऐवजी मुंबईकर रेल्वे रूळच ओलांडतात आणि अपघात होतात. पुलांचा वापर न करता किंवा सुरक्षिततेबाबत दुर्लक्ष करून रूळ ओलांडण्याच्या वृत्तीपायी २००८-०९ या वर्षी मुंबईत २६९०, कोलकात्यात ७३५, चेन्नईत१७ मृत्यू झाले तर दिल्लीत २२५९ जण मृत्यूला सामोरे गेले. तसेच रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्याचे प्रमाण तर चिंतनीय म्हटले पाहिजे. दिल्लीत याच काळात ५४१ जणांनी तर मुंबईत ३५ जणांनी रूळावर आत्महत्या केल्यात.

अशाप्रकारचे मृत्यू थांबविण्यासाठी तातडीने ठोस उपाय करण्याची आवश्यकता काकोडकर समितीने आपल्या अहवालातून व्यक्त केली आहे. यासाठी एक उच्चस्तरीय कृती समिती स्थापन करावी आणि समितीमार्फत रूळ ओलाडतांना होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाय करावेत, अशी शिफारस या समितीने केली आहे. ही उच्च समिती कधीतरी स्थापन होईल आणि या समस्येवर जे उपाय योजेल ते निश्‍चितच उपयोगी असतील, पण त्याअगोदर काही उपाय मात्र ताबडतोब लागू करण्यासारखे आहेत. जसे रेल्वे प्रवाशांना स्टेशनवर येण्यासाठी तसेच एका प्लेटफॉर्मवरून दुसरऱ्या प्लेटफॉर्मवर जाण्यासाठी जास्तीतजास्त उत्तम प्रकारच्या सोयी उपलब्ध कराव्यात, या सुविधा करतांना अपंगांच्या गरजांचा प्राधान्याने विचार करावा. रूळावर प्रवाशांना थेट प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ठिकठिकाणी कुंपणाची व्यवस्था करावी, अशा प्रकारे अपघात रोखण्यासाठी जनजागृती करणे, यासाठी प्रवाशांच्या संघटनांच्या सूचना आणि सहकार्य प्राप्त करणे असे उपाय योजता येण्यासारखे आहेत. तसेच विनाटिकीट सापडल्यावर जसा टीसी लगेच दंड आकारतो, दंड न भरल्यास विशिष्ट शिक्षेची तरतूद असते, त्याच प्रकारची तरतूद असुरक्षितपणे रेल्वे रूळ ओलांडतांना लागू केली पाहिजे. म्हणजे सरळपणे रेल्वे रूळ ओलांडतांना आढळल्यास त्यावर एफआयआर नोंद करणे, त्यास अर्थिक दंड लागू करणे, तसेस अशाचप्रकारे पुन्हा रेल्वे रूळ ओलांडतांना सापडल्यास अशा व्यक्तीस रेल्वेस्टेशन्सवर येण्यास बंदी घालणे, असे ठोस उपाय वरील मृत्यूंचे आकडे विचारात घेता लागू करण्यास रेल्वे प्रशासनाने गंभीरपणा दाखवायला हवा.

खरंतर रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. १८५३ मध्ये इंग्रजांनी मुंबई-ठाणे या ५३ किलोमीटरच्या अंतरासाठी रेल्वेसेवा सुरू केली. ही रेल्वे सेवा आज एक मोठे नेटवर्क झाले आहे. आठ हजार पेक्षा जास्त स्टेशन्स असलेल्या भारतीय रेल्वे रूळांची लांबी एक लाख किलोमीटरपेक्षा जास्त आहे. रेल्वेत १४ लाखाहूनही अधिक कर्मचारी काम करतात. देशातील संघटित कर्मचाऱ्याच्या संख्येतील ८.५ टक्के वाटा रेल्वेचा आहे. रेल्वेने दररोज एक कोटी २० लाखापेक्षा जास्त भारतीय प्रवास करतात. तर १० लाखापेक्षा जास्त टन माल दररोज वाहून नेला जातो. अशी रेल्वेबाबत असलेली आकडेवारी आपण मोठ्या दिमाखात जरी मिरवत असलोतरी रूळ ओलांडतांना मृत्यूचे आकडे हे रेल्वे प्रशासनावर फार मोठा डाग असल्यासारखे आहेत. कुठलीतरी उच्च समिती अभ्यास करेल आणि अहवाल सादर करेल, तोपर्यंत या मृत्युंच्या आकड्यांमध्ये काही हजारांची भर पडू शकते. म्हणून रेल्वे प्रशासनाने मृत्युंचा हा डाग दूर करण्यासाठी स्वस्तरावर ताबडतोब उपाययोजना राबवाव्या आणि हे मृत्यूसत्र थांबवावे.

Yogesh Ramakant Bholane

Director, Nikant Classes, Dhule | Contact: +91 9881307618. I am a passionate professional writer, crafting engaging articles on diverse topics like current affairs, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues for newspapers, magazines, and digital platforms. With over 20 years as a District-Level Trainer at the Maharashtra Centre for Entrepreneurship Development (MCED), I’ve delivered hundreds of training sessions, inspiring and guiding thousands of young entrepreneurs across Maharashtra. I’m also skilled in video editing, VFX, website development, and blogging, bringing creativity and technical expertise to every project. At Nikant Classes, we empower students with courses for Scholarship, NTS, MTS, Manthan, Jawahar Navodaya, and regular classes for State Board, CBSE, and ICSE.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने