विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी
maharashtra-mlc-election

महायुतीचे विधान परिषदेत ९ उमेदवार विजयी

मुंबईत दि.१२-०७-२०२४ रोजी राज्यातील विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झाला. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्वच्या सर्व ९ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्याचे दिसून आले. महायुतीच्या नेत्यांमध्ये आनंद आणि उत्साह दिसून येत असून या विजयाचे शिल्पकार म्हणून उपमुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं जातंय. पुरेशी मतं नसतानाही तिसरी जागा लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या अंगलट आल्याचं चित्र विधान परिषदेच्या ११ जागांच्या निकालांमधून स्पष्ट झालं. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा धक्कादायक पराभव-

ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणूक चुरशीची झाली होती. ११ जागांसाठी उभा राहिलेल्या १२ पैकी एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. तब्बल ५ वेळा विधिमंडळ सभागृहात सदस्य राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना राजकारण्यांनी धूळ चारली. या निवडणुकीत जयंत पाटील (गरूरपीं रिींळश्र) यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने जयंत पाटील यांना पुरस्कृत केले होते. तरीही, त्यांचा पराभव झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले जयंत पाटील (शेकाप) यांच्या पारड्यात फक्त १२ मते पडल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते, त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर, या निवडणुकीत कॉंग्रेसची मतं फुटली अन् त्याचा थेट फायदा मिलिंद नार्वेकरांना झाल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीतील जयंत पाटील यांचा पराभवाने अनेकांना निराश केले. लोकसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनी मविआला मदत केली, नारायण नागोजी पाटील हे प्रथम विधानसभा सदस्य होते. मात्र, त्यांच्याच नातवाला म्हणजे जयंत पाटील यांना त्यांच्या शताब्दी अगोदर असं सभागृहातून बाहेर काढणं चांगलं नाही. जयंत पाटील हे सहज निवडून आले असते, असे म्हणत जयंत पाटील यांच्या पराभवाला ठाकरेच जबाबदार असल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करुन महाविकास आघाडीतील उबाठा पक्षाच्या अजगराने शिक्षक भारती, शेकाप आणि कम्युनिष्ट या तिन्ही पक्षाला गिळल्याचं म्हटलं आहे. आता, मंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रिया देताना ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

मते फुटण्याचा अंदाज-

लोकसभेतील यशामुळे मविआ आघाडी विधानपरिषद निवडणुकीत शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या आमदारांची मते फोडेल, अशी चर्चा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आणि महायुतीने विधानपरिषद निवडणुकीत बाजी मारली. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या करिश्मा कायम असल्याचे दिसून आले. २०२२ ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी विजयाची हॅट्रिक करुन दाखवली. विधानपरिषेदेच्या गणितांमध्ये फडणवीसांची बेरीज सर्वांवरच भारी पडल्याची चर्चा आता रंगली आहे. त्यांनी सलग पाच टर्म आमदार राहिलेल्या आणि शरद पवार पुरस्कृत उमेदवार असलेल्या जयंत पाटील यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. शरद पवार गट आणि ठाकरे गटाला अपयश लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्‍वास दुणावलेला ठाकरे गट आणि शरद पवार गट महायुतीची मते फोडेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे विशेषत: अजितदादा गटाच्या उमेदवारांना धोका असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवार गटाला अजितदादा गटाचे एकही मत फोडण्यात यश आले नाही. तर उद्धव ठाकरे यांनाही शिंदे गटाची मते फोडण्यात अपयश आले. यामुळे मविआचे तिसरे उमेदवार असणार्‍या जयंत पाटील यांचा पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती. तर, आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

हॉटेल डिप्लोमसीचा खेळ

निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी गुरुवारी आमदारांना हॉटेलमध्ये बंदिस्त करण्यात आले होते. हॉटेल डिप्लोमसी खेळण्यात आली होती. मात्र, हे मतदान गुप्त पद्धतीने असल्याने त्यांच्या मतांवर कोणीही निर्बंध घालू शकत नव्हते आणि तसेच झाले. या निवडणुकीत नेमकी कुणाची आणि किती मते फुटली यावर अजूनही अंदाज बांधणे सुरू आहे.

कॉग्रेसची मते फुटली-

सुरुवातीपासूनच कॉंग्रेसची मते फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची २३ मते मिळवत विजय मिळवला. त्यामुळे कॉंग्रेसची ८ मते फुटल्याची जोरदार चर्चा आहे.

पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन

पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय अनेक अर्थांनी भाजपसाठी महत्त्वाचा आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होत्या. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मराठवाड्यातील मुंडे समर्थक दुखावले होते. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळाल्याने पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे.

देवेंद्र फडणवीसांना यांचे तांत्रिक विश्‍लेषण यशस्वी

देवेंद्र फडणवीस यांच प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटर्जी आणि तिन्ही पक्षांमधलं कॉर्डिनेशनयशस्वी झाले आहे. केवळ स्वत:च्या पक्षाचं नाही तर महायुतीमधील तिन्ही पक्षांच कॉर्डिनेशन त्यांनी केलं आहे. गेल्या वेळेच्या निवडणुकीलाही हेच टेकिनकल ऍनालिसिस यशस्वी झाले होते. विधान परिषदेच्या लढवल्या जाणार्‍या निवडणुकांमध्ये टेक्निकली खूप साऊंड असावं लागलं. कारण या निवडणुकीचे दोन भाग असतात. एक म्हणजे गणित जुळवून आणणे. गणितच जुळवावं लागतं की कोणाला किती प्राधान्य द्यायचं. दुसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची मतं इनटॅक्ट ठेवणं. या दोन्हींमध्ये गेल्या वेळेस फडणवीसांचाच फार मोठा रोल असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मंताचे विभाजन-

भाजपचे विजयी उमेदवार
-पंकजा मुंडे २६ मते
-परिणय फुके २६ मते
-सदाभाऊ खोत २६ मते
-अमित गोरखे २६ मते
-योगेश टिळेकर २६ मते

राष्ट्रवादी अजित पवार गट
-शिवाजीराव गर्जे २३ मते
-राजेश विटेकर २४ मते

शिवसेना शिंदे गट
-कृपाल तुमाने २५ मते
-भावना गवळी २४ मते

कॉंग्रेस
-प्रज्ञा सातव २५ मते

शिवसेना ठाकरे गट
-मिलिंद नार्वेकर २४ मते


लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी  करिष्मा करेल असा अंदाज होता. कारण विधान परिषदेतही तीन जागांवर विजय मिळणार, असा विश्वास मविआकडून व्यक्त केला जात होता. नुकत्याच  विधिमंडळात पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाल्याने विधान परिषदेत महायुती पुन्हा एकदा अभंग राहिल्याचे दिसून आले. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. तसेच काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. मात्र, शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले जयंत पाटील (शेकाप) यांच्या पारड्यात फक्त १२ मते पडल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने