बचत गटांच्या माध्यमातून कृषी विकास

Agricultural-development-through-self-help-groups
Agricultural-development-through-self-help-groups

स्वयं-सहायता गट म्हणजेच बचत गट भारताच्या ग्रामीण भागात, विशेषतः कृषी विकासाच्या क्षेत्रात एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आले आहेत. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी, क्रेडिटमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि सदस्यांमध्ये परस्पर समर्थन वाढवण्यासाठी हे बचत गट प्रामुख्याने महिलांनी बनलेले आहेत. शेतीच्या संदर्भात, शेतकर्‍यांची आर्थिक लवचिकता वाढविण्यात, उत्पादकता सुधारण्यात आणि शाश्वत उपजीविका सुनिश्चित करण्यात बचत गट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

शेतीचे सक्षमीकरणात भारतातील स्वयं-सहायता गटांची भूमिका

ग्रामीण बँकेसारखी संकल्पना राबवून ग्रामीण भागात गरिबी निर्मूलनाची क्रांती करण्याचे सर्व श्रेय डॉ. महमंद युनूस यांना जाते. त्यांच्यामुळे महिलांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून कमालीचा आत्मविश्‍वास निर्माण झाला. संपूर्ण जगात बचत गटांची चळवळ पसरली. त्यामुळेच बचत गटांच्या चळवळीचे जनक म्हणून डॉ. महमंद युनूस यांना संबोधले जाते, तसेच नोबेल पुरस्कारनही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. भारतात १९९२ पासून बचत गट स्थापना आणि निर्मितीस मोठ्या प्रमाणावर वेग आला. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने, गट आणि बँकांकडून होणार्‍या पतपुरवठ्याची सांगड घातल्यानंतर बचत गट चळवळ व्यापक होत गेली. आज बचत गटांची देशातील संख्या ४० लाखाच्यावर आहे. शासनाने सुमारे दहा हजार कोटीं रूपयांची मदत या बचत गटांना केली आहे. विशेष म्हणजे बचत गटांच्या कर्ज परतफेडीचे प्रमाण ९६ टक्के आहे.

निश्‍चित स्वरूपाचे उद्दिष्ट घेऊन स्वईच्छेने एकत्र आलेल्या लोकांचा/ महिलांचा समूूह म्हणजे बचत गट होय. एकाच कारणासाठी गटातील लोकांच्या उन्नत, विकास व फायद्यासाठी एकत्रित आलेला हा एक समुहच असतो. या बचत गटात प्रत्येक सभासद समान रक्कम, ठराविक कालावधीत बचत म्हणून एकत्र करतात व त्याचा उपयोग सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी लोकशाही मार्गाने करतात. खरं तर ही कोणतीही योजना अथवा प्रकल्प नसून महिलांना संघटित करण्यासाठी, त्यांना विकासात्मक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठीचे माध्यम होय. विशेष म्हणजे बचत गटांची नोंदणी बंधनकारक नाही. मात्र ती केल्याने विविध शासकीय योजनांचा फायदा घेता येतो. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिका आदी स्यायत्त संस्थांनी नेमलेले अधिकारी, नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळासारखी मंडळे व अशासकीय संस्था देखील बचतगटांची नोंदणी करतात.

बचत गट स्थापनेच्या पायर्‍या-

बचत गट स्थापन करण्यासाठी किमान १० सदस्य लागतात. म्हणून सुरूवातीला विशिष्ट कार्यक्षेत्रातील इच्छुक महिलांचा गट तयार केला जातो. सर्वांच्या संमतीने सोईच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी बैठक आयोजित करून बचत गटाविषयी माहिती दिली जाते. बैठकीत सर्व संमतीने गटाला एक नाव देण्यात येते व गटामध्ये जमा करावयाच्या बचतीची रक्कम ठरविली जाते. नंतर बँकेत खाते उघडले जाते व प्रत्येक महिन्याची जमा रक्कम खात्यात जमा करण्यात येते. एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती गटात सभासद होऊ शकते. शेजारी राहणार्‍या महिला किंवा एकाच ठिकाणी काम करणारे १५ ते २० सहकारी बचत गट स्थापन करू शकतात. गट स्थापनेचा कालावधी सर्वसाधारणपणे ६ महिने गृहित धरला आहे. सहा महिन्यानंतर गटाची ग्रेडींग करण्यात येते.

बचत गटांचे फायदे-

ग्रामीण भागातील बहुतांश महिला केवळ गृहिणी म्हणून जीवन जगतात. घरातील पुरूष मंडळीच कमावणारे असल्यामुळे त्यांना पैशांच्या व्यवहारात स्थान मिळत नाही. तसेच कमी शिक्षण किंवा ग्रामीण भागातील मर्यादित असलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे त्यांना बर्‍याचवेळा ईच्छा असूनसुद्धा स्वयंरोजगार निर्माण करता येत नाही. परंतु या बचत गटांमुळे त्यांचे संघटन होते, त्यांना काटकसरीची सवय लागते आणि बचत होते. परस्पर सहकार्य व विश्‍वास निर्माण होतो. बचत गटातील सभासदांना अंतर्गत कर्जपुरवठा अल्प दराने होतो. तसेच महिलांना घराबाहेर पडून नवीन बाबी शिकण्याची संधी मिळते. महिला स्वावलंबी होतात. महिलांना कर्ज घेणे आणि परतफेड करणे अशा आर्थिक व्यवहारांची माहिती होते. विशेष म्हणजे त्यांचे समाजात स्थान निर्माण होते.

बचतगटांमार्फत व्यवसाय-

महिला बचत गटांमार्फत उत्तम प्रकारे व्यवसाय करता येतो. बचत गटातील महिलांना व्यवसायाचे मुलभुत धडे दिल्यास, त्यांनी व्यावसायिक गुण अंगीकारल्यास व्यवसाय करणे सोपे जाते. महिलांनी चालविलेल्या या काही बचत गटांनी आश्‍चर्यकारक प्रगती केली आहे. हजारोमध्ये वार्षिक उलाढाल करणारे गटांनी जबरदस्त ईच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या उलाढाली लाखो रूपयापर्यंत पोहचविल्या आहेत. शासन देखील व्यवसाय सुरू करण्यासाठी बचत गतांना प्रोत्साहन देत असते.

कृषीपूरक बचत गट-

महिला बचत गटांचे जास्तीजास्त जाळे हे ग्रामीण भागातच पसरले आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून असतात. एका बाजूला पुरूषमंडळी कृषी व्यवसायात राबत असतांना दुसरीकडे बचत गटातील महिलांचा सहभाग कृषी व्यवसायाला अत्यंत उपयोगी ठरला आहे. कारण शेतीला खरीप हंगामात नेहमी पैशांची गरज भासते. अशावेळी घरातील महिलेकडून बचत गटामार्फत तात्पुरती गरज भागविली गेल्यास शेतकर्‍यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत नाही. बचत गटातून मिळालेला हा पैसा अल्प व्याजदराने मिळत असल्यामुळे त्याची परतफेड शेतकर्‍याला सहज शक्य होते. तसेच महिला बचत गट केवळ पैशांची देवाण घेवाणच करत नाहीतर उद्योग-व्यवसाय सुद्धा करतात. काही बचत गटांनी तांब्याची भांडी, लाकडी खेळणी, स्वेटर्स, पेपर्स प्रॉडक्टस्, कापडी पिशव्या, घरगुती वस्तू, गोधड्या, बांबूच्या नक्षीदार वस्तू, मायक्राम झुले, हॅण्ड बॅगा, सौर चुली यासंबधी व्यवसाय करून चांगली उलाढाल केली आहे. तर काही बचत गटांनी राजगिरा लाडू, पापड, लोणची, केक, कुरडई, चकली, चिवडा, जाम, जेली अशा प्रकारे उद्योग करून नाव कमविले आहे. काही बचत गटांनीतर विशिष्ट पदार्थ बनविण्यात चांगली प्रसिद्ध मिळवून स्वत:चा एक ब्रॅण्ड तयार केला आहे.

काही बचत गटांचे उद्योग हे पूर्णपणे शेती उत्पादनावर अवलंबून असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतमाल विकण्यासाठी मध्यस्ताची गरज न घेता गावातच चांगल्या भाव मिळू शकतो. तसेच शेतकर्‍याचे जे कुटुंब केवळ घरातील पुरूषांच्या कमाईवर अवलंबून होते, ते आता बायकाही कमवायला लागल्यामुळे घरखर्चाची विभागणी झाली आणि एकावरच येणारा भार कमी झाला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुद्धा महिला बचत गटांच्या सक्रियतेमुळे रोखता येऊ शकतात, असे आता सरकारला सूचले आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये आत्मविश्‍वास आला, व्यावहारिक निर्णय घेण्याची कुवत आली, अडचणींना सामोरे जायचे शहाणपण आले, आर्थिक अडचंणीच्या वेळी पैसा पुरविण्याची ताकद आली, त्यामुळे ज्या घरातील स्त्री ही महिला बचत गटाची सक्रिय सभासद आहे, त्या घरात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्‍नच उदभवणार नाही, असे आता शेती शास्त्रज्ञांचे मत बनू लागले आहे.

बचत गटांच्या माध्यमातून होणारा बहुआयामी कृषी विकास-

बचत गटांच्या माध्यमातून होणारा कृषी विकास हा बहुआयामी आहे. हे गट शेतकर्‍यांना चांगले बियाणे, खते आणि आधुनिक शेती उपकरणांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक आर्थिक संसाधने देऊन सक्षम करतात. क्रेडिटच्या पारंपारिक अडथळ्यांना मागे टाकून या बचत गटांमुळे शेतकर्‍यांची बचत एकत्रित करून, सदस्यांना अनुकूल अटींसह सूक्ष्म कर्ज मिळू शकते. सुलभ कर्ज पद्धतीचा हा पर्याय शेतकर्‍यांना सुधारित कृषी पद्धतींचा अवलंब करण्यास, त्यांचे पीक उत्पादन वाढविण्यास आणि त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणण्यास सक्षम करतो. शिवाय, बचत गट शेतकर्‍यांमध्ये ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार करण्यास मदत करतात. नियमित बैठका आणि प्रशिक्षण सत्रांद्वारे, सदस्य नाविन्यपूर्ण शेती तंत्र, कीटक व्यवस्थापन आणि शाश्वत पद्धतींबद्दल माहिती सामायिक करतात. हे सामूहिक शिक्षण वातावरण समुदायाची एकूण कृषी कौशल्ये वाढवते, ज्यामुळे अधिक कार्यक्षम आणि उत्पादक शेती पद्धती निर्माण होतात.

महिला बचत गटांची प्रगती-

स्वत:चे ब्रॅण्डीग केल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकणार नाही, ही कल्पना मान्य झाल्यामुळे काही बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करून स्वत:ची ओळख तयार केली आहे. घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून बँकेत पत तयार केली आहे. काही बचत गटातील महिलांनी स्वतं:त्र प्रशिक्षण घेऊन नवीन प्रकारचे प्रॉडक्ट बाजारात आणले आहेत. मुंबईत तर एका संस्थेमार्फत महिला बचत गटांना त्यांची उत्पादने परदेशात पाठविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शासनाने सुद्धा वेगवेगळ्या योजनांच्या आधारे अनेक फायदे  उपलब्ध करून दिले आहेत. आतातर शासनाने नुकताच प्रत्येक गावात व्हिलेज मॉल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावातील महिला बचत गटांना हक्काचे आणि सुविधायुक्त विक्री केंद्र उपलब्ध होणार आहे.

शेतीसबंधीत कार्य करणारे बचत गट बाजारपेठेतील संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांच्या उत्पादनाचे एकत्रितपणे विपणन करून, शेतकरी चांगल्या किंमतींची वाटाघाटी करू शकतात आणि मध्यस्थांकडून होणारे शोषण कमी करू शकतात. ही सामूहिक सौदेबाजीची शक्ती शेतकर्‍यांना त्यांच्या आर्थिक स्थैर्य आणि वाढीस हातभार लावत नफ्यातील वाजवी वाटा मिळेल याची खात्री देते. अशा तर्‍हेने बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांची झालेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. तसेच या बचत गटांमुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शेतीव्यवसायाला हातभार लावला आहे,त्यामुळे शेतकरी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करता आले आहे.

Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने