सात राज्यांत विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीची सरशी

सात राज्यांत विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीची सरशी
India-bloc-leads-by-elections

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक :२०२४ च्या़ निकालानंतर सात राज्यांमध्ये १३ जागांसाठी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही इंडिया आघाडीने यशाची कमान चढतीच ठेवल्याचे शनिवारी (१३-०७-२०२४) जाहीर झालेल्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या इंडिया आघाडीने आता सात राज्यांतील तेरा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दहा जागांवर विजय मिळवला आहे. तर, भाजपाने दोन जागा मिळवल्या असून एका जागेवर अपक्ष आमदार निवडून आला आहे.

देशात 13 जागांवर पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा भाजपाला मोठा झटका

बिहार, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यातील १३ जागांवर बुधवारी (१०-०७-२०२४) मतदान प्रक्रिया पार पडली. कॉंग्रेसने भाजपशासित उत्तराखंडमध्ये दोन आणि हिमाचल प्रदेशमध्ये दोन अशा चार जागा जिंकल्या. तृणमूल कॉंग्रेसने पश्चिम बंगालमधील चारही जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाने पंजाबमधील जालंधर पश्चिम जागा जिंकल्या आणि तमिळनाडूमधील विक्रवंडी मतदारसंघात द्रविड मुन्नेत्र कळघम विजयी झाले. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जागा भाजपने जिंकली तर अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी बिहारमधील रुपौली जागा जिंकली. विविध पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या मृत्यूमुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांमुळे पोटनिवडणूक घेण्यात आली.

कुठे झाली पोटनिवडणूक

बिहारमधील रुपौली, पश्‍चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला; तामिळनाडू मधील विक्रवंडी; मध्य प्रदेशातील अमरवारा; उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगळौर; पंजाबमधील जालंधर पश्‍चिम आणि हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या ठिकाणी मतदान झाले. आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. यात इंडिया आघाडीने दहा ठिकाणी आघाडी घेतली असून भाजपची येथे पिछेहाट झाली आह घेण्यात आली.

कुणी कुठे विजय मिळविला-

पश्चिम बंगालमधील चार, हिमाचल प्रदेशातील तीन, उत्तराखंडमधील दोन आणि पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूतील प्रत्येकी एका जागेसाठी बुधवारी (१०-०७-२०२४) मतदान पार पडले होते. भाजपने हिमाचल प्रदेशातील हमीरपूर आणि मध्य प्रदेशातील अमरवार या जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेस, तृणमूल, आप आणि द्रमुक हे इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत.

उत्तराखंड

कॉंग्रेसने भाजपशासित उत्तराखंडमधील दोन आणि हिमाचल प्रदेशमधील दोन अशा चार जागांवर विजय मिळविला आहे. उत्तराखंडमधील मंगळूर आणि बद्रीनाथ जागेवर पोटनिवडणूक झाली.या जागा यापूर्वी कॉंग्रेस आणि बसपाकडे होत्या आणि त्या जागा जिंकण्याचे आव्हान भाजपसमोर होते.त्यात भाजपला यश मिळाले नाही. या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसने विजय मिळवत सत्तारूढ भाजपला धक्का दिला. लखपालसिंह बुटाला यांनी बद्रीनाथ मतदारसंघात माजी मंत्री व भाजप उमेदवार राजेंद्रसिंह भंडारी यांचा पाच हजार मतांनी पराभव केला. राजेंद्र भंडारी हे आधी येथून आमदार होते, पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दुसरीकडे, बसपाचे आमदार सरबत करीम अन्सारी यांच्या निधनानंतर रिक्त झालेली मंगळूरची जागा कॉंग्रेसच्या काझी निजामुद्दीन यांनी जिंकली आणि चुरशीच्या लढतीत त्यांनी भाजपच्या कर्तारसिंग भडाना यांचा ४२२ मतांच्या निसटत्या फरकाने भाजप उमेदवाराचा पराभव केला. काझी निजामुद्दीन याआधी तीनवेळा या जागेवरून कॉंग्रेसचे आमदार राहिले आहेत.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने चारही जागांवर भाजपच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे. एकाअर्थाने सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसने राज्यातील चार विधानसभा जागांवर क्लीन स्वीप केले. विशेष म्हणजे यातील तीन जागा यापूर्वी भाजपकडे होत्या. मात्र आमदारांनी पक्ष बदलल्याने येथे पोटनिवडणूक झाली. रायगंज, रानघाट दक्षिण, बागडा तसेच मनिकटला या चारही मतदारसंघात ५० हजारांहून अधिक मताधिक्याने तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला. रायगंज मतदारसंघातून तृणमूलचे उमेदवार कृष्णा कल्याणी यांनी भाजपचे उमेदवार मानसकुमार घोष यांचा ४९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार मधुपर्णा ठाकूर यांनी बागडा मतदारसंघात ३३४५५मतांनी विजय मिळवला. याशिवाय राणाघाटमधून तृणमूलच्या मुकुट मणी यांनी भाजपच्या मनोज कुमार बिस्वास यांचा सुमारे ३९ हजार मतांनी पराभव केला. माणिकतला मतदारसंघात तृणमूलच्या सुप्ती पांडे यांनी भाजपच्या कल्याण चौबे यांचा ४१४०६ मतांनी पराभव केला.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसने तीनपैकी २ जागा जिंकल्या आहेत.यापूर्वी या तीन जागा अपक्ष उमेदवारांकडे होत्या. देहरा मतदारसंघातून हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांची पत्नी आणि कॉंग्रेसच्या उमेदवार कमलेश ठाकूर यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार होशियारसिंह यांचा देहरा मतदारसंघात ९३९९ मतांनी पराभव केला आहे. नालागढ मतदारसंघातून कॉंग्रेसच्या हरदीपसिंग बावा यांनी भाजपच्या के. एल. ठाकूर यांचा सुमारे ९ हजार मतांनी पराभव झाला. हमीरपूरमध्ये भाजपच्या आशिष शर्मा यांनी कॉंग्रेसच्या पुष्पेंद्र वर्मा यांचा १५७१ मतांनी पराभव केला.

पंजाब

आपने पंजाबमधील जालंधर पश्चिम जागा जिंकली आहे. पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत आपची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. पंजाबच्या जालंधर पश्चिम मतदारसंघात सत्तारूढ आम आदमी पक्षाच्या मोहिंदर भगत यांनी भाजपच्या शीतल अंगरुल यांचा सुमारे ३७ हजार मतांनी पराभव केला.त्यांनी आपचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील अमरवाडा मतदारसंघाचाही निकाल लागला आहे. तेथे भाजपला यश मिळाले. अमरवरा येथे भाजपच्या कमलेश प्रताप शहा यांनी ३२५३ मतांनी कॉंग्रेसच्या धीरेन शहा यांचा पराभव केला. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने अमरवाडा जागा जिंकली होती, परंतु कमलेश प्रताप यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही जागा रिक्त झाली होती. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे हे प्रभावक्षेत्र मानले जाते.

बिहार

बिहारच्या रुपौली जागेवर अनपेक्षित निकाय बघायला मिळाला. जेडीयू आणि आरजेडीसारख्या पक्षांना मागे टाकत अपक्ष उमेदवार शंकर सिंह विजयी झाले. त्यांनी संयुक्त जनता दलाच्या कलाधर प्रसाद मंडल यांचा पराभव केला. येथे राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर गेला. विमा भारती जेडीयूमध्ये गेल्याने येथील जागा रिक्त झाली होती. विमा भारती यांनीही लोकसभा निवडणूक लढवली होती, पण तिथेही त्या तिसर्‍या क्रमांकावर होत्या.

तामिळनाडू

तमिळनाडूत द्रमुकने मोठ्या फरकाने विक्रवंडी मतदारसंघातील जागा राखली. द्रमुकचे अन्नियूर शिव शिवाशनमुगम. ए. यांनी पट्टाली मक्कल कच्ची पार्टी (पीएमके)चे अंबुमनी. सी यांचा ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. येथे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकने निवडणुकीत भाग घेतला नव्हता.

राहुल गांधी यांची प्रतिक्रिया-

शेतकरी, तरुण, मजूर, व्यापारी, नोकरदार अशा प्रत्येक वर्गाला हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. लोक आता त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी पूर्णपणे इंडिया आघाडीबरोबर उभे आहेत. सात राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे भाजपने विणलेले भय आणि संभ्रमाचे जाळे फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. जय हिंदुस्थान, जय संविधान असे राहुल गांधी म्हणाले.

कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया-

या विजयाबद्दल कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. देशातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांबद्दल कॉंग्रेसने आनंद व्यक्त केला असून हे निकाल म्हणजे देशातील राजकीय वातावरण बदलत असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या नकारात्मक राजकारणाला जनतेने नाकारले आहे हे निकालावरून सिद्ध होते, असेही खर्गे यांनी मनोगत व्यक्त केले.

ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया-

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी लोकांचे आभार मानले आणि सांगितले की पक्ष पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीतील विजय २१ जुलैच्या शहीद दिनाच्या मेळाव्यात शहीदांना समर्पित करेल.

एमके स्टॅलिन काय म्हणाले-

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी भारतीय गटाच्या चांगल्या कामगिरीचा उल्लेख केला आणि भाजपने पराभवातून धडा घेतला पाहिजे असे म्हटले. ते म्हणाले, भाजपने हे लक्षात घेतले पाहिजे की प्रादेशिक भावनांचा आदर केल्याशिवाय ते सरकार आणि पक्ष चालवू शकत नाहीत.

देशभरातील पोटनिवडणुकीचा थोडक्यात निकाल

  • पश्चिम बंगालमध्ये चारही जागा ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी ने जिंकल्या.
  • पंजाबच्या जालंधरमधून आम आदमी पार्टीने बाजी मारली.
  • तामिळनाडू विक्रावंडीची सीट डीएमकेने जिंकली.
  • बिहार रुपौली सीट अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी जिंकली.
  • उत्तराखंडच्या दोन्ही जागा कॉंग्रेसने जिंकल्या.
  • हिमाचल प्रदेशात तीन पैकी दोन जागा कॉंग्रेसने आणि एक सीट भाजपाने जिंकली.
  • मध्य प्रदेश अमरवाडाची सीट भाजपाने जिंकली.
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने