फायदेशीर शेतीसाठी शेतकऱ्यांमध्ये आवश्यक गुण


Qualities of farmers for profitable farming
Qualities of farmers for profitable farming

कृषी व्यवसाय हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हे या क्षेत्रामागील प्रेरक शक्ती आहेत. तथापि, शेती हा केवळ एक व्यवसाय नाही, तर ती एक जीवनपद्धती आहे ज्यात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, ज्ञान आणि गुणांचा अद्वितीय संच आवश्यक आहे. हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि बाजारातील चढउतार या वाढत्या आव्हानांमुळे भारतातील शेतकऱ्यांकडे फायदेशीर शेती सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक गुण असणे आवश्यक आहे.

भारतातील फायदेशीर शेतीसाठी गुण आणि कौशल्ये

आजच्या गतिमान कृषी युगात शेतकर्‍यांनी केवळ जमिनीची लागवड आणि पीक उत्पादन याकडे बघण्यापेक्षा त्यांनी स्वत:मध्ये नवनिर्मिती करणारा उद्योजक शोधणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक राहण्यासाठी शेतकरी बांधवांनीे नवीन तंत्रज्ञान, शाश्वत पद्धती आणि बाजारातील ट्रेंडशी जुळवून घेण्यास सक्षम असले पाहिजेत. म्हणून भारतात फायदेशीर शेतीसाठी पारंपारिक ज्ञान, आधुनिक कौशल्ये आणि शेतीची आवड यांचा मिलाफ आवश्यक आहे. हा लेख भारतातील फायदेशीर शेती साध्य करण्यासाठी शेतकर्‍यांच्या आवश्यक गुणांवर प्रकाश टाकतो.हे गुण समजून घेऊन, शेतकरी त्यांची कौशल्ये वाढवू शकतात, त्यांची उत्पादकता वाढवू शकतात आणि भारताच्या कृषी क्षेत्राच्या वाढीस हातभार लावू शकतात.

स्वयंप्ररेणा

कुठलाही व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर भांडवल, जागा, कच्चा माल इ. बाबी आवश्यक असतात. जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे या तिन्ही बाबी तयार असतात, फक्त आवश्यकता असते ती स्वयंप्ररेणेची. कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वयंप्रेरणा या गुणाची नितांत आवश्यकता असते. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे ग्रामीण भागात नेहमी ऐकावयास मिळते. शेती व्यवसायाचे देखील तसेच आहे. मनापासून इच्छा नसतांना जर हा व्यवसाय केला तर यश मिळणार नाही. शेती करतांना शेतीवर मनापासून प्रेम हवे, केवळ काहीतरी करायचे म्हणून हा व्यवसाय यशस्वी होणे शक्य नाही.

स्वत:साठी राखीव वेळ

परंतु केवळ स्वयंप्रेरणा जागृत झाली म्हणजे शेती व्यवसाय जमला, असे म्हणता येणार नाही. जागृत झालेल्या या स्वयंप्ररेणेला कृतीत आणण्यासाठी उत्साह आणि आत्मविश्‍वास या गुणांची जोड हवी. कारण शेतकरी हा स्वत:च त्याच्या शेती व्यवसायाचा मालक असतो आणि नोकरही असतो. त्यामुळे पडेल ते काम करण्यासाठी त्याच्या अंगी उत्साह असणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी स्वत:च मालक असल्यामुळे त्याला शेती व्यवसायातील सर्वच आघाड्यांवर पुढाकार घेऊन काम करावे लागते. तसेच जे काम शेतकरी करतो ते योग्य आहे की नाही किंवा काहीतरी चुकते याबाबत गांेंधळ होऊ नये म्हणनू आत्मविश्‍वास असणे आवश्यक आहे. उत्साह आणि आत्मविश्‍वास हे गुण शब्दांनी जरी जागृत होत असलेतरी ते कृतीत आणण्यासाठी शेतकर्‍यांनी स्वत:साठी काही वेळ देणे आवश्यक आहे. शेतीत राबराब राबून आपल्यासाठी धान्य पिकविणारा शेतकरी सर्व वेळ शेतीला देतो, स्वत:साठी तो वेळ राखीव ठेवत नाही. शेतकर्‍यांनी दररोज सकाळी योगासन, प्राणायाम, सकाळच्या शांत वातावरणात ४-५ किलोमीटर चालणे अशा प्रकारचे दररोज व्यायाम केल्यास केवळ एक महिन्यात शेतकर्‍यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्‍वास जागृत होईल.

समस्यांशी सामना

कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय म्हटला म्हणजे प्रत्येक वळणावर आणि टप्प्‌यावर समस्या उभ्या असतात. कुणीतरी येईल आणि आपली समस्या सोडवेल आणि आपल भल होईल अशी स्वप्ने शेतकरी नेहमी बघत असतात. परंतु हे कदापि योग्य नाही. शेतकर्‍यांनी स्वत:च पुढाकार घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा महत्त्वाचा गुण अंगी बाळगायला हवा. ग्रामसेवक, कृषी सहायक, कृषी अधिकारी किंवा शासनाचे प्रतिनिधी आपल्या शेतीतील समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपल्या शेतात येतील, ही वाट पहाण्यापेक्षा स्वत:च त्या त्या कायार्र्लयात जाऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी सल्ला विचारायला हवा. योग्य वेळी सल्ला मिळाला तर शेतीत कमीतकमी नुकसान होते.

शेतमालाची गुणवत्ता

तसेच स्वतंत्र विचारसरणी हा गुण सुद्धा महत्त्वाचा आहे. आपल्या शेतीतून जो शेतमाल बाहेर पडतो, तो विशिष्ट गुणवत्ता टिकविणारा असावा. जसे जळगावची केळी प्रसिद्ध आहे, नाशिकची द्राक्षे सर्वांना माहित आहे, तसेच शेतकर्‍याचे नाव सखाराम असेल तर सखारामने त्याच्या शेतातील गुणवत्ता सातत्याने टिकविल्यास सर्व म्हणतील मिरची, टोमॅटो आणि वांगी खावीतर सखारामच्या शेतातलीच. स्वतंत्र विचारसरणी या गुणाद्वारे शेतकर्‍याने त्याच्या शेतमालाचा विशिष्ट ब्रॅण्ड निर्माण करणे अपेक्षित आहे. ब्रॅण्ड निर्माण झालातर शेतमालाला इतरांपेक्षा हमखास जास्त दर मिळतो.

नाविन्याची आवड

नाविन्याची आवड आणि कल्पकता असलेला शेतकरीच या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो. एकच पारंपारिक पीक घेण्यापेक्षा बाजाराभावाचा कल लक्षात घेऊन पिके घ्यावयास हवीत. ऑफसिझनला एखादे पीक घेऊन जास्तीचा बाजारभाव कसा मिळविता येईल, याचा विचार हवा. एकच पीक संपूर्ण शेतात घेण्यापेक्षा पिकघेण्याच्या निरनिराळ्या पद्धती अभ्यासायला हव्यात. थोडक्यात शेती हा व्यवसाय असल्यामुळे स्वत:ला कोणते पीक घेणे आवडते हा विचार केल्यापेक्षा ग्राहकांना काय हवे आहे, हे ओळखायला हवे. एखादे नवीनच पीक घेण्याचे ठरविल्यास धोका असतोच. शेतकर्‍यांच्या अंगी काहीतरी वेगळ करून यशस्वी होण्याची वृत्ती फारच कमी प्रमाणात आढळते. अर्थातच, काहीतरी वेगळ करण्यात धोका हा आहेच, पंरतु व्यवसायात कुठलाही धोका न पत्करण, हा सर्वात मोठा धोका समजला जातो. सध्याच्या स्थितीत कृषी क्षेत्रात जरी जबरदस्त क्रांती झाली असली तरी सुद्धा बर्‍याच वेळा सर्वच बाबतीत अनिश्‍चितता जाणवते. शेतीत गुंतविलेला किमान पैसा वसूल होईल का? योग्य बाजारभाव मिळेल का? असे अनेक प्रश्‍न धोका स्विकारतांना शेतकर्‍याच्या मनात येतात. परंतु काहीतरी वेगळ मिळविण्यासाठी काहीतरी वेगळ कराव लागत, या नियमानुसार शेतकर्‍यांनी धोका स्विकारायला हवाच. संपूर्ण शेतात १०० टक्के बदल करून धोका घेण्यापेक्षा शेतातील काही भागात वेगळे पीक किंवा प्रयोग करून, तो अभ्यासून नंतर पुढील वर्षी त्या धोक्याचे परीक्षण करून नियोजन करायला हवे.

सहनशिलता

सहनशिलता हा महत्त्वाचा गुण शेतकर्‍याच्या अंगी हवाच, अन्यथा शेती होणे शक्यच नाही. भारनियमनामुळे वीज कर्मचार्‍यांना मारहाण, कृषी अधिकार्‍यांना घेराव, रस्ता रोको असे केल्यामुळे समस्यांना प्रसिद्धी मिळते, परंतु समस्या सुटत नाही. शेती व्यवसायात अनेक संकटे दररोज उगवतात, कधी कधी उधारी वाढते, कधी तर जास्त मजुरी देऊन योग्यवेळी मजूर उपलब्ध होत नाही, एखाद्या हंगामात तोटा होतो तर आपला शेतमाल बाजारात आल्यावर नेमक्या त्याच दिवशी शेतमालाचे दर कोसळतात अशा अनेक संकटांना शेतकर्‍यांना नेहमीच सामना करावा लागतो. अशा वेळी अशी संकटे स्विकारण्याची शेतकर्‍यांनी हिम्मत दाखवायला हवी. जी संकटे सोडविणे आपल्या हातात आहे, ती सोडविण्यासाठी हालचाल करायला हवी, परंतु जी संकटे सोडविणे आपल्या हातात नाही, तेव्हा आपले मनोधैर्य खचू न देता शेतकर्‍यांनी पुढील हंगामाचे नियोजन करण्यास सुरूवात करायला हवी. प्रत्येक व्यवसायाचा नियम असतो की जो नफ्याचा वाटेकरी आहे, तोच तोट्याचा वाटेकरी असतो. म्हणून शेतकर्‍यांनी या नियमाचे चिंतन करून जसा कपाशी विकून भरपूर पैसा कमविला तसा दुसरे एखादे पीक तोट्यात गेल्यास आगपाखड न करता, धीर खचू न देता त्याचा देखील स्वीकार करायला हवा.

संवाद आणि संघटन कौशल्य

शेती व्यवसाय करतांना शेतकर्‍याचा अनेक लोकांशी संबध येतो. खरीप हंगामात मजूर योग्य वेळी उपलब्ध होणे तर फारच आवश्यक असते. मजूरांची मजूरी ठरविणे, कामाचे स्वरूप पटविणे, योग्य कालावधीत काम पूर्ण करून घेणे या सर्वबाबी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आणि मजूरांशी योग्यतर्‍हेने संवाद साधण्यासाठी संघटन कौशल्य हा फार महत्त्वाचा गूण शेतकर्‍यांच्या अंगी असणे आवश्यक आहे. एका अभ्यानुसार आपले शेतकरी संघटन कौशल्यात अजुनही हवे तसे तरबेज झालेले आढळत नाही कारण केवळ संघटन कौशल्य या गुणाच्या अभावामुळेच मजूर टंचाई निर्माण झाली आहे.

शेवटी, भारतातील फायदेशीर शेतीसाठी पारंपारिक शेती पद्धतींच्या पलीकडे जाणारा बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. सध्याच्या गुंतागुंतीच्या शेतीपद्धतीचा सामना करणयासाठी शेतकर्‍यांकडे कौशल्ये, ज्ञान, अनुकूलता, लवचिकता, प्रभावी संवाद, जोखीम व्यवस्थापन आणि शाश्वततेची बांधिलकी यासारख्या आवश्यक गुणांची आवश्यकता आहे. फायदेशीर शेतीसाठी शेतकऱ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण पद्धती आणि शाश्वत पद्धती आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. शिवाय, शेतकर्‍यांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला, तसेच त्यांच्या कुटुंबाच्या आणि समुदायाच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. सरतेशेवटी, भारतीय शेतीचे भवितव्य शेतकऱ्यांच्या वेगाने बदलणार्‍या जगाशी जुळवून घेण्याच्या, नवनवीन शोध घेण्याच्या आणि भरभराट करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.

वरील सर्व गुण आत्मसात झाले म्हणजे शेती यशस्वी झाली असा गोड गैरसमज शेतकर्‍यांनी करायला नको. कारण शेती व्यवसाय करतांना आज किती फायदा होणार आहे या विचारासोबत पुढे किती फायदा होईल याचे सुद्धा सदैव चिंतन करावयास हवे. शेतमाल विकून सर्वच पैसा लगेच अनुत्पादक कारणांसाठी खर्च करून आणि पुढील खरीप हंगामात बियाणे आणि खतांसाठी सावकारापुढे हात पसरण्यापेक्षा प्रत्येक हंगामात मी अमुक अमुक इतक्या पैशाची बचत करेल, असे शेतकर्‍याने नियोजन करूनच खर्च करायला हवा. म्हणूनच इतर गुणांसोबत दूरदृष्टी हा गुण शेतकर्‍यांनी सदैव आपल्या मनात कोरून ठेवायला हवा.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने